
राज्यसभा निवडणुकीत छोटे पक्ष व अपक्ष आमदारांना गळाला लावण्यात भाजपला यश आलं खरं, पण विधान परिषदेसाठी होणाऱया गुप्त मतदानामुळे भाजपलाच आता आमदारांत फाटाफूट होऊन क्रॉस व्होटिंग होण्याचा धोका वाटू लागला आहे. तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसकडे दुसरी जागा निवडून आणण्यासाठी स्वतःचं असं पुरेसे संख्याबळ नसल्याने अतिरिक्त मतांसाठी उमेदवारांनी धावाधाव सुरू केली आहे. पहिल्या फेरीत निवडून येण्यासाठी अपक्ष व छोटय़ा पक्षांच्या आमदारांवरच सर्व उमेदवारांची भिस्त आहे.
राज्यसभेत सर्वच पक्षांकडे उमेदवार निवडून आणण्यासाठी आवश्यक सुरक्षित मतांचा कोटा असल्याने तसेच खुल्या मतदानामुळे पक्षाच्या अधिकृत मतांमध्ये फाटाफुट झाली नाही. मात्र विधानपरिषदेच्या निवडणुकीत सुरक्षित मतांचा कोटाच मर्यादित असल्याने पहिल्या फेरीत उमेदवार विजयी करण्यासाठी पक्षाकडील अधिकृत मतांसोबतच अतिरिक्त मतांची बेगमी करावी लागणार आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी छोटे पक्ष व अपक्ष आमदारांना आपलंसं करत राज्यसभेत एक अतिरिक्त जागा निवडून आणली. मात्र विधानपरिषदेसाठी होणारे गुप्त मतदान आणि उमेदवारीवरून असलेल्या पक्षांतर्गत नाराजीचा सर्वाधिक फटका भाजपला बसण्याचा धोका आहे. यामुळे ‘तुमचं मतदान कुणाला होत आहे, हे समजेल’ अशीच व्युहरचना पक्षाकडून या निवडणुकीत आखली जात असल्याचे गर्भीत इशारे भाजपकडून स्वपक्षाच्या आमदारांना दिले जात आहेत.
हंडोरे, जगताप यांच्यासाठी जुळवाजुळव कशी करणार?
काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे आणि भाई जगताप हे दोन उमेदवार रिंगणात असून त्यांच्याकडे 44 आमदारांचे संख्याबळ आहे. हंडोरे व जगताप यांना दोघांनाही पहिल्या फेरीत निवडून आणण्यासाठी तब्बल 10 अतिरिकत मतं बाहेरून मिळवावी लागणार आहेत. महाविकास आघाडीतील तीन पक्षांकडे मुळातच मर्यादित मतांचा कोटा असल्याने या निवडणुकीत एकमेकांना मतं देऊ शकणार नाहीत. हंडोरे यांना पहिल्या फेरीतच सुरक्षित करा, अशा सूचना काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी दिल्याने मतांची जुळवाजुळव कशी करायची असा प्रश्न काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांना पडला आहे.
दरेकर, लाड यांच्यासाठी भाजपची आकडेमोड
भाजपचे पाच उमेदवार रिंगणात असून त्यांच्या विजयासाठी 135 मतांची गरज लागणार आहे. भाजपकडे 106 आमदार असून पाचवा उमेदवार विजयी करण्यासाठी सर्वच्या सर्व मतं ही बाहेरून आणावी लागणार आहेत. त्यामुळे राम शिंदे, श्रीकांत भारतीय व उमा खापरे यांना पहिल्या फेरीत निवडून आणण्याबरोबरच पक्षाबाहेरून आलेले प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्यासाठी भाजप नेत्यांनी आकडेमोड सुरू केली आहे. यासाठी स्वतः देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, गिरीश महाजन विविध आमदारांच्या संपर्कात आहेत.
रामराजे सुरक्षीत, खडसेंसाठी जमवाजमव
राष्ट्रवादीकडून रामराजे निंबाळकर व एकनाथ खडसे हे दोन्ही महत्वाचे नेते रिंगणात असून त्यांना पहिल्या फेरीत निवडून आणणे हा त्यांच्या प्रतिष्ठेचा विषय आहे. रामराजे हे विधानपरिषदेचे सभापती असल्याने त्यांच्यासाठी सुरक्षीत मतांचा कोटा राष्ट्रवादीकडून दिला जाईल. न्यायालयाने अनिल देशमुख व नवाब मलिक यांना मतदानाची परवानगी नाकारल्याने राष्ट्रवादीची हक्काची दोन मते कमी झाली आहेत. त्यामुळे खडसे यांना पहिल्या फेरीतच निवडून आणण्यासाठी बाहेरून अतिरिक्त मतांची जमवाजमव करावी लागणार आहे. भाजपात असलेली पक्षांतर्गत नाराजी व खडसे यांचे पक्षातील जुने संबंध या निमित्ताने कितपत कामी येतात हे पहावे लागेल.
मतांच्या बेगमीसाठी उमेदवारांची वसईवारी
बहुजन विकास आघाडीचे तीन आमदार असून त्यांचीच भूमिका राज्यसभा निवडणुकीत निर्णायक ठरली होती. त्यामुळे विधानपरिषदेसाठी त्यांचा पाठींबा मिळवून अतिरिक्त मतांची बेगमी करण्याचे प्रयत्न उमेदवारानी सुरू केले आहेत. राष्ट्रवादीचे उमेदवार सभापती रामराजे निंबाळकर, काँग्रेस उमेदवार भाई जगताप, भाजपाचे प्रसाद लाड यांनी वसई येथे जाऊन बाविआचे प्रमुख हितेंद्र ठाकुर यांची भेट घेऊन चर्चा केली.





























































