विहार ओव्हरफ्लो, सातही तलाव तुडुंब, जुलैपर्यंतच्या पाण्याचा प्रश्न मिटला! तलावांमध्ये 91 टक्के पाणीसाठा

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱया तलावक्षेत्रात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे सातही तलाव तुंडुंब भरले असून आज विहार तलावही ओव्हरफ्लो झाला. सातही तलावांत सद्यस्थितीत 1319640 दशलक्ष लिटर पाणीसाठा जमा झाला आहे. हे पाणी पुढील 342 दिवसांना पुरणारे म्हणजेच जुलै 2026 पर्यंत पुरणारे आहे. यामुळे मुंबईचा जुलैपर्यंतचा पाणी प्रश्न मिटला आहे.

यंदाच्या पावसाळ्यात मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱया 7 तलावांपैकी 6 तलाव याआधीच भरून ओसंडून वाहिले आहेत. मागील काही दिवसांमध्ये पाणलोट क्षेत्रात सातत्याने होत असलेल्या दमदार पावसामुळे जलाशयांची पाणी पातळी झपाटय़ाने वाढत आहे. आजच्या पहाटेच्या मोजणीनुसार सर्व तलावांमध्ये मिळून 131964 दशलक्ष लीटर इतका जलसाठा उपलब्ध आहे. हा जलसाठा एकूण जलसाठय़ाच्या अर्थात 14 लाख 47 हजार 363 दशलक्ष लिटरच्या तुलनेत 91.18 टक्के इतका आहे.

आज दुपारी ओसंडून वाहू लागलेल्या विहार तलावाची कमाल जलधारण क्षमता 27,698 दशलक्ष लीटर आहे.  हा तलाव गत वर्षी 25 जुलै रोजी मध्यरात्री 3.50 वाजता, 2023 मध्ये 26 जुलै रोजी रात्री 12.48 वाजता, 2022 मध्ये 11 ऑगस्ट रोजी आणि सन 2021 मध्ये 18 जुलै रोजी ओसंडून वाहू लागला होता.