
मुंढवा जमीन घोटाळा प्रकरण सुरू असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवर आणखी एक 300 कोटी रुपयांच्या घोटाळय़ाचा आरोप करण्यात आला आहे. पार्थ अजित पवार यांच्या मुंढवा जमीन घोटाळय़ाच्या व्यवहारात साक्षीदार असलेल्या व्यक्ती आणि काहीजणांच्या संगनमताने हा घोटाळा झाला असून, त्याच जागेवर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय असल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
शिवाजीनगर येथील ‘डेक्कन शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशन’च्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय आहे. या संस्थेच्या जागा भाडय़ाने देण्यास धर्मादाय आयुक्तांनी परवानगी दिली होती, मात्र या संस्थेच्या विश्वस्तांनी ती जागा विकली. विजय कुंभार म्हणाले, ‘महारेरा’च्या संकेतस्थळावरील माहितीनुसार, या प्रकल्पाबाबतीत कोणताही करार करण्यास बंदी करण्यात आली आहे. ‘डेक्कन शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशन’ची जागा शिवाजीनगरला आहे. ती जागा विकसित करण्याकरता ‘कल्पवृक्ष प्लॅन्टेशन’ नावाच्या कंपनीने हा प्रकल्प घेतला. कोणत्याही संस्थेची जागा द्यायची झाली, तर धर्मादाय आयुक्तांची परवानगी लागते. तशी परवानगी घेण्यात आली; परंतु ती परवानगी साठ वर्षांकरिता लीजसाठी देण्यात आली होती. त्यासाठी टेंडर काढण्याचे भासविण्यात आले; परंतु या कंपनीने ही जागा विकलेली आहे. त्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय आहे. ती जागा आणि व्यवहार संशयास्पद आहे.
कुंभार म्हणाले, या ठिकाणी 15 हजार चौ.फूट एफएसआय असाताना 63 हजार चौ.फूट बांधकाम असलेली इमारत बांधण्यात आली. जागा विक्रीचा कोणताही अधिकार नसताना कंपनीने 6 मजले परस्पर विकले. त्याची पिंमत 300 कोटी रुपये आहे.
विजय कुंभार यांच्या म्हणण्यानुसार, या संपूर्ण व्यवहारासाठी साहिल प्रधान या व्यक्तीला ‘पॉवर ऑफ अटर्नी’ देण्यात आली. साहिल प्रधान हा मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणात अमेडिया कंपनी आणि शीतल तेजवानी यांच्यातील व्यवहाराचा साक्षीदार होता. कल्पवृक्ष कंपनीचे संचालक आणि सुनेत्रा पवार या काही कंपन्यांमध्ये एकत्र संचालक राहिले आहेत. त्यामुळे या व्यवहारात केवळ संस्था आणि बिल्डरच नाही, तर सत्ताधारी राजकीय नेतृत्वाचाही प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंध असल्याचा संशय निर्माण होतो. विशेष म्हणजे, 2017 पासून या जागेच्या विकासासाठी हालचाली सुरू होत्या, मात्र कोणतीही ठोस कारवाई आजपर्यंत झाली नाही, यावरून भाजपही या प्रकरणात सहभागी असल्याचा आरोप त्यांनी केला.
पार्थ पवार यांचा संबंध
मुंढवा जमीन घोटाळय़ामध्ये पार्थ अजित पवार यांच्या ‘अमेडिया’ कंपनीबरोबर कुलमुखत्यार शीतल तेजवानी यांनी व्यवहार केला. यामध्ये साहिल प्रधान हा साक्षीदार आहे, असे सांगून विजय कुंभार म्हणाले, याच साहिल प्रधानला डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशनने शिवाजीनगर येथील जमीनप्रकरणी साहिल प्रधान याला पॉवर ऑफ अॅटर्नी देऊन कल्पवृक्ष प्लँटेशनबरोबर व्यवहाराचे सर्व अधिकार दिले होते. त्यामुळे या प्रकरणाशी पार्थ पवार यांचा संबंध येतो. तसेच आयकर विभागाच्या एका कागदपत्रानुसार कल्पवृक्ष प्लँटेशन कंपनीबरोबर पार्थ पवार यांचा 5 कोटी रुपयांचा व्यवहार झाला होता. त्याची कागदपत्रे मी सोबत दिली आहेत. त्यामुळे या घोटाळय़ाशी पार्थ पवार यांचा संबंध असल्याच्या आरोपावर मी ठाम असल्याचे विजय कुंभार यांनी सांगितले.
































































