Ahmedabad Plane Crash – विजय रुपाणींचा पायलट शेजारी बसलेला फोटो व्हायरल, बोईंग विमान कसे उडवतात याची घेतलेली माहिती

गुजरातमधील अहमदाबाद येथे गेल्या महिन्यात एअर इंडियाच्या ड्रीमलायनर विमानाचा मोठा अपघात झाला होता. लंडनला निघालेले एअर इंडियाचे विमान AI171 हे उड्डाणानंतर काही सेकंदात कोसळले. या विमानात केबिन क्रूसह 242 प्रवासी होते. अहमदाबादच्या बीजे मेडिकल हॉस्टेलवर हे विमान कोसळले आणि विमानातील एक प्रवासी वगळता सर्वांचाच मृत्यू झाला. याच विमानातून गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे लंडनला निघाले होते. त्यांचाही या अपघातात मृत्यू झाला. 12 जूनला झालेल्या या अपघाताला एक महिना पूर्ण होत असतानाच विजय रुपाणी यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात ते बोईंग 737-200 विमानाच्या कॉकपीटमध्ये पायलटच्या सीटवर बसल्याचे दिसत आहे.

अहमदाबादमध्ये विमान अपघात होण्याच्या दोन महिने आधी विजय रुपाणी यांनी बोईंग 737-200 विमानाची माहिती घेतली होती. हे विमान अहमदाबादच्या इंडस युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसमध्ये ठेवण्यात आलेले आहे. 50 वर्षांपूर्वीचे हे विमान इंडस युनिव्हर्सिटीमध्ये 7 वर्षांपूर्वी आणण्यात आले होते. याच विमानाच्या कॉकपीटमध्ये विजय रुपाणी हे पायलटसोबत बसल्याचे दिसत आहेत.

विजय रुपाणी हे 8 एप्रिल रोजी इंडस युनिव्हर्सिटीमध्ये ‘वन नेशन वन इलेक्शन’ या मुद्द्यावर संबोधित करण्यासाठी पोहोचले होते. त्यानंतर युनिव्हर्सिटीच्या एव्हीएशन डिपार्टमेंटने रुपाणी यांना बोईंग 737-200 विमानाची सैर घडवली आणि त्यांना कॉकपीटमध्ये नेऊन विमानाची माहिती दिली.

याबाबत एव्हीएशन विभागाचे एचओडी कॅप्टन उमंग जानी माध्यमांशी बोलताना सांगितले की, ‘विजय रुपाणी दोन महिन्यांपूर्वी बोईंग 737-200 विमानाच्या कॉकपीटमध्ये माझ्या शेजारीच बसले होते. पाच मिनिटे ते इथे होते, पण ती भेट अविस्मरणीय होती. कॉकपीटमध्ये मी डाव्या, तर रुपाणी उजव्या सीटवर बसले होते. सीटवर कसे बसावे, स्टिअरिंग कसे वापरावे आणि कंट्रोलिंग सिस्टिम याबाबत त्यांनी माहिती घेतली होती.’

अहमदाबाद विमान दुर्घटनेत कट; मोदी सरकारला संशय; ब्लॅक बॉक्समधील डेटाचा सर्व बाजूंनी तपास करणार

विजय रुपाणी हे एखाद्या शिकाऊ विद्यार्थ्याप्रमाणे मला प्रश्न विचारत होते. विमान कसे उडते, पायलट विमान कसे उडवतात. तसेच कॉकपीटमध्ये डिस्प्लेवर अनेक मीटर आहेत, ते कसे काम करतात आणि हे एवढे सगळे पायलट लक्षात कसे ठेवतात, असे प्रश्न त्यांनी विचारले होते. या भेटीचे काही फोटो त्यांनी आपल्या सोशल मीडियावरही शेअर केले होते, असेही कॅप्टन उमंग जानी यांनी सांगितले. ‘आज तक‘ने याबाबत वृत्त दिले आहे.

अहमदाबाद अपघातानंतर डीजे पार्टी, एअर इंडिया सॅट्सचे 4 वरिष्ठ अधिकारी निलंबित