सत्तेत राहण्यासाठी भाजप आणि सभापती कार्यालयाने संगनमताने बेकायदेशीर पक्षांतराला प्रोत्साहन दिले – विजय सरदेसाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भाजप आणि सभापती कार्यालयाने संगनमताने सत्तेत राहण्यासाठी बेकायदेशीर पक्षांतराला प्रोत्साहन दिल्याचा आरोप गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी केला आहे. भाजपचे हे कारस्थान लवकरच उघड होईल असे त्यांनी म्हटले आहे. फातोर्डाचे आमदार सरदेसाई म्हणाले की, दोन वर्षांपूर्वी घडलेल्या पक्षांतर प्रकरणाने गोव्याची प्रतिमा खराब केली आहे. त्यावेळी भाजपला सत्तेत राहण्यासाठी 12 आमदारांनी पक्ष सोडून त्यांना पाठिंबा दिला होता. तसेच या प्रकाराला त्यांनी विलिनीकरण असे म्हटले होते.

“या आमदारांच्या पक्षांतराने गोव्याची प्रतिमा खराब केली आहे आणि राजकीय फायद्यासाठी राज्यघटनेच्या 10 व्या अनुसूचीची (पक्षांतरविरोधी) देखील हत्त्या केली आहे.” असे सरदेसाई पुढे म्हणाले. सरदेसाई यांनी सांगितले की गोवा फॉरवर्डने, काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रकरणात हस्तक्षेप याचिका दाखल केली कारण आमदारांचे हे विलीनीकरण बेकायदेशीर आहे याचे त्यांना माहिती हक्क कायद्याद्वारे पुरावे सापडले आहे. “भाजप आणि सभापती कार्यालयाने या पक्षांतरांना पाठिंबा दिला आहे. अशा प्रकारांमुळे विकास कामांमध्ये अडथळे निर्माण होत असल्याने अशा गोष्टी थांबवायला हव्यात” असे सरदेसाई म्हणाले.

“आमची हस्तक्षेप याचिका भाजप आणि सभापती कार्यालयाचा पर्दाफाश करेल, ज्यांनी बेकायदेशीरपणे पक्षांतर केले आणि गेली दोन वर्षे सत्तेत राहिले. भाजपने पक्षांतराला समर्थन आणि प्रोत्साहन देण्याच्या प्रक्रियेत कसा फेरफार केला हे लोकांना कळेल.” असे ते म्हणाले. गोव्याच्या राजकारणात नव्याने प्रवेश केलेले राजकीय पक्षही पैशाच्या जोरावर पक्षांतराला प्रोत्साहन देत आहेत, असेही ते म्हणाले. “गोव्यात निवडणूकपूर्व आणि निवडणुकीनंतर पक्षांतर होत आहे, कारण पैशाची ताकद असलेले राजकीय पक्ष त्याला प्रोत्साहन देत आहेत. हे सुद्धा आपण उघडकीस आणले पाहिजे.” असे सरदेसाई म्हणाले.