निकालात छेडछाड आणि ईव्हीएम हॅक करून निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न, वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप करताना म्हटले की, आज तीनही पक्षांमध्ये प्रचंड कलह आहे आणि एकमेकांविरोधात उभे करण्याचे, एकमेकांची प्रतिमा खराब करण्याचे काम सुरू आहे तर, जनता फक्त तमाशा पाहत आहे. अशा परिस्थितीत भाजपला 175 जागा मिळणार असल्याचा दावा आधीच करणं म्हणजे लोकांच्या मनात निकालाची पूर्वसूचना रुजवून नंतर त्यानुसार घडामोडी घडवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला. बिहारमध्ये महिलांच्या मतांवर परिणाम करणारे आर्थिक प्रलोभन दिल्याचे कबुल करण्यात आले होते. तसाच पॅटर्न आता महाराष्ट्रात दिसत असल्याचे ते म्हणाले. ईव्हीएमचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी स्पष्ट आरोप केला की, भाजपला 170-175 जागा मिळाल्या तर त्याचा सरळ अर्थ हा आहे की, निकालात छेडछाड आणि ईव्हीएम हॅकिंगद्वारे निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न झाला आहे.

वडेट्टीवार यांनी पुढे सांगितले की, ईव्हीएमसमोर फक्त मशिन दिसते, पण हॅकिंग बाहेरून होते, मग उमेदवारांनी समोर बसून मशिनकडे पाहत राहण्यात अर्थ काय? त्यांनी मतदार खरेदीवरही प्रश्न उपस्थित केला आणि कामठीतील घटनेचा उल्लेख करत लाखो–कोट्यवधी रुपयांचा वापर निवडणुकीत झाल्याचे सांगितले. एका मतासाठी 20 हजार रुपये दिल्याची कबुली स्वतः आमदारांकडून येत असल्याने सत्ता वापरून मतं खरेदी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. निवडणुका 20 दिवस पुढे ढकलण्यामध्येही उद्देश निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करून निकाल उलटवण्याचा असल्याचे ते म्हणाले. त्यांनी निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेसाठी सीसीटीव्ही फुटेजचा लाईव्ह ऍक्सेस उमेदवारांना द्यावा, मोठी स्क्रीन बसवावी आणि जॅमर लावावा अशी मागणी केली. मात्र, तीही मान्य केली जात नसल्याने सरकारची भूमिका संशयास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. विजय वडेट्टीवार यांच्या मते, वास्तविक जनतेच्या आधारावर नव्हे तर, मशिनच्या आधारावर 175 जागा जिंकण्याचा सरकारचा उद्देश असल्याचे आता स्पष्ट झाले, असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला.