विक्रम लँडरचे अवशेष, पुरावे सापडले

2330

>> सुजाता बाबर

चांद्रयान-2 या महत्त्वाकांक्षी मोहिमेच्या अयशस्वी लॅण्डिंगमुळे आणि विक्रम लॅण्डरशी संपर्क तुटल्याने अवघ्या देशभरातील खगोलप्रेमींना जणू धक्का बसला होता. मात्र या यानाने पाठविलेल्या चंद्राच्या पृष्ठभागाच्या छायाचित्रांमध्ये विक्रम लॅण्डरच्या अवशेषांचे काही पुरावे सापडले असल्याचा दावा चेन्नई येथील यांत्रिकी अभियंता शन्मुगा सुब्रमण्यम यांनी केला आहे. या तर्काच्या संशोधनातून विक्रम लॅण्डर व प्रज्ञान बग्गीविषयी ठोस माहिती व पुरावे मिळण्यास मदत होणार आहे.

चांद्रयान-2च्या प्रक्षेपणाला 22 जुलै रोजी एक वर्ष पूर्ण झाले. ही मोहीम अनेक अर्थांनी महत्त्वपूर्ण आहे. ही हिंदुस्थानची दुसरी चांद्रमोहीम आहे. या यानाचे कक्षाभ्रमर (Orbiter), लॅण्डर (Lander) व रोव्हर (Rover) संपूर्णपणे हिंदुस्थानात विकसित करण्यात आले आहेत आणि यामुळे हिंदुस्थानच्या अवकाश तंत्रज्ञानातील क्षमतेचे उत्तम उदाहरण ठरले आहे. चांद्रयान-2चे प्रक्षेपण सुरुवातीच्या तांत्रिक अडचणीमुळे 14 जुलै 2019 ऐवजी 22 जुलै 2019 रोजी करण्यात आले. उड्डाण यशस्वी झाले. कक्षाभ्रमर कक्षेमध्ये फिरू लागला. ‘विक्रम लॅण्डर’चे लॅण्डिंगदेखील झाले; परंतु हे यान उतरत असताना चंद्राच्या पृष्ठभागापासून अवघ्या 2100 मीटर उंचीवर असताना त्याचा संपर्क तुटला. इस्रोच्या या महत्त्वाकांक्षी मोहिमेच्या अयशस्वी लॅण्डिंगमुळे आणि विक्रम लॅण्डरशी संपर्क तुटल्याने अवघ्या देशभरातील खगोलप्रेमींना जणू धक्का बसला होता. ही घटना आहे 7 सप्टेंबर, 2019 रोजीची!

परंतु 8 सप्टेंबर रोजी पुन्हा आशा पल्लवित झाल्या; कारण कक्षाभ्रमराच्या मदतीने काही छायाचित्रे विक्रम लॅण्डरने पाठविली होती. परंतु विक्रम लॅण्डरशी संपर्क मात्र होऊ शकला नव्हता. विक्रम लॅण्डरच्या आत प्रज्ञान बग्गी आहे आणि चंद्राच्या पृष्ठभागाचा अभ्यास करणे प्रज्ञान बग्गीचे कार्य होते.

18 जून 2009 रोजी अमेरिकेने ‘लुनार रीकन्सायन्स ऑर्बिटर’ चंद्राभोवती प्रक्षेपित केला होता. याचे प्रमुख काम म्हणजे चंद्रावर मानवी वस्तीच्या नियोजनाची पूर्वतयारी करणे आणि चंद्राच्या वातावरणाचा सूक्ष्म अभ्यास करणे. हे यान आजही चंद्राभोवती फिरत आहे आणि पुढील किमान 7 वर्षे तरी भ्रमण करेल. या यानाने पाठविलेल्या चंद्राच्या पृष्ठभागाच्या छायाचित्रांमध्ये विक्रम लॅण्डरच्या अवशेषांचे काही पुरावे सापडले आहेत. हे विक्रम लॅण्डरचे अवशेष आहेत असे चेन्नई येथील यांत्रिकी अभियंता शन्मुगा सुब्रमण्यम यांनी सांगितले होते. 33 वर्षीय शन्मुगा सुब्रमण्यम हे चेन्नई येथे एका आयटी फर्ममध्ये ऍप डेव्हलपर आहेत. त्यांच्या मते ‘प्रज्ञान बग्गी’ सुरक्षित आहे. विक्रम लॅण्डर उतरल्यावर त्यातून ती काही मीटर अंतरापर्यंत गेली आहे असेही त्यांचे म्हणणे आहे. कारण लॅण्डर उतरल्यावर तीन तासांनी स्वयंचलितपणे ती बाहेर पडेल अशी त्याची रचना केलेली होती.

चंद्राच्या पृष्ठभागावर ज्या ठिकाणी विक्रम लॅण्डर उतरले त्या ठिकाणच्या म्हणजे विक्रम लॅण्डर आघात जागेच्या लुनार रीकन्सायन्स ऑर्बिटरने आता घेतलेल्या छायाचित्रांमध्ये दिसणारे अवशेष पूर्वी घेतलेल्या छायाचित्रांमध्ये दिसत नाहीत. म्हणजे हे अवशेष विक्रम लॅण्डरचेच असावेत असा शन्मुगा सुब्रमण्यम यांचा तर्क आहे. हे अवशेष कदाचित इतर पेलोड्स, इंजिन्सचे, लॅण्डरच्या सांगाडय़ाचे असू शकतील असेही त्यांचे म्हणणे आहे. ही छायाचित्रे जानेवारी 2020 महिन्यातील असून त्यांचा पूर्ण अभ्यास केल्यावर मे 2020मध्ये सुब्रमण्य यांनी हे अनुमान प्रसिद्ध केले आहे. त्यांच्या मते ‘प्रज्ञान बग्गी’ सुरक्षित असून इस्रो त्याचा शोध घेईल; परंतु इस्रोने मात्र असे काही सांगितलेले नाही. नासाकडून अधिकृत छायाचित्रे आल्याशिवाय अजून निश्चित काही सांगता येणार नाही असे इस्रोचे म्हणणे आहे. परंतु नासाच्या सप्टेंबर 2019 महिन्यातील ट्विटमध्ये मात्र विक्रम लॅण्डरच्या अवशेषांविषयी उल्लेख आणि छायाचित्रदेखील आहे.
यूएस स्पेस एजन्सीने 26 सप्टेंबर 2019 रोजी (परंतु 17 सप्टेंबर 2019 रोजी घेतलेल्या) आघात जागेची मोझाईक प्रतिमा प्रसिद्ध केली आणि लॅण्डरच्या खाणाखुणा शोधण्यासाठी आघात होण्यापूर्वी त्याच भागाच्या प्रतिमांशी तुलना करण्याची विनंती केली. यामध्ये शन्मुगा सुब्रमण्यम हे पहिले उत्साही खगोलप्रेमी होते आणि त्याप्रमाणे त्यांनी त्यांचे म्हणणे मांडले. या प्रतिमांचा अभ्यास केल्यावर त्यांनी असे म्हटले आहे की, हा अवशेष जिथे मुख्य आघात झाला त्या जागेपासून वायव्य दिशेला 750 मीटर्स अंतरावर आहे. यानंतर लुनार रीकन्सायन्स ऑर्बिटरने 14, 15 ऑक्टोबर आणि 11 नोव्हेंबर 2019 रोजी पाठविलेल्या छायाचित्रांमध्येदेखील याला पुष्टी मिळते. परंतु या प्रतिमांमध्ये हे अवशेष खूप चमकदार नाहीत. विक्रम लॅण्डरचेच अवशेष आहेत का, लॅण्डर चंद्राच्या पृष्ठभागाखाली रुतले आहे का, हे गहन प्रश्न आहेत.

इस्रोतर्फे विक्रम लॅण्डरच्या आघाताविषयी आणि तुटलेल्या संपर्काविषयी शोध घेण्यासाठी खास टीम केली आहे. तिच्या कार्याला शन्मुगा सुब्रमण्यम यांच्या निरीक्षणांमुळे चालना मिळाली आहे. नासानेदेखील त्यांचे कौतुक केले आहे. इस्रोचे तज्ञ शन्मुगा सुब्रमण्यम यांच्या तर्काविषयी संशोधन करीत आहेत.

चांद्रयान-2 ही आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची मोहीम ठरली आहे. ही संपूर्ण लॅण्डर मोहीम होती. याने आपल्या तंत्रज्ञानाला एक वेगळय़ा उंचीवर नेऊन ठेवले आहे. जरी विक्रम लॅण्डरचे लॅण्डिग अयशस्वी झाले असले तरी मोहीम अयशस्वी ठरू शकत नाही. शन्मुगा सुब्रमण्यम यांच्या तर्काच्या संशोधनातून काही नावीन्यपूर्ण आणि उपयुक्त माहिती मिळाल्यास विक्रम लॅण्डर व प्रज्ञान बग्गीविषयी अजून ठोस माहिती व पुरावे मिळण्यास मदत होईल.

(लेखिका खगोल अभ्यासक आहेत.)

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या