
गावाच्या सर्वांगीण विकासामध्ये ग्रामपंचायत महत्त्वाची भूमिका बजावत असते. प्रत्येक ग्रामपंचायत स्वयंपूर्ण झाली तर राज्याच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळते. गावाच्या विकासासाठी मतभेद व मनभेद विसरून सामूहिक एकजूट दाखविण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
नियोजन भवन येथे ठाणे जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाच्या वतीने सन 2018-19 चा स्मार्ट ग्राम पुरस्कार व सन 2019-20 चा आर.आर.(आबा) पाटील सुंदर गाव या पुरस्कारांचे वितरण पालकमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ठाणे जिल्ह्यातील एकूण १२ ग्रामपंचायतीना तालुका आणि जिल्हास्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमाला व्यासपीठावर जिल्हा परिषद अध्यक्ष सुषमा लोणे, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भाऊसाहेब दांगडे, उपाध्यक्ष सुभाष पवार, आरोग्य व बांधकाम समिती सभापती कुंदन पाटील, कृषि, पशुसंवर्धन व दुग्धशाळा समिती सभापती संजय निमसे, महिला व बाल कल्याण समिती सभापती रत्नप्रभा तारमाळे, समाज कल्याण समिती सभापती नंदा उघडा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते, प्रकल्प संचालक छायादेवी सिशोदे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( ग्रामपंचायत) चंद्रकांत पवार, जिल्हा परिषद सदस्य सुभाष घरत, रेखा कंठे, भांडे , आदी मान्यवर उपस्थित होते.
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत आर.आर.पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शिंदे यांनी आबांच्या आठवणीना उजाळा देताना सांगितले की, स्व.आर.आर.पाटील यांनी ग्रामविकासामध्ये केलेले काम राज्य आणि देशासाठी मार्गदर्शक आहे. ग्राम विकासासाठी आबांनी मांडलेल्या संकल्पनावर आजही गाव विकास सुरू आहे. लोकोपयोगी व सामाजिक एकोपा जपण्याची स्वयंप्रेरणा जनमाणसात रुजवण्याचे काम आबांनी केले असेही त्यांनी यावेळी सांगितले. ठाणे जिल्ह्यातील गावे राज्यासाठी आदर्श निर्माण करणारे व्हावेत असा सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांनी परस्पर समन्वयातून गावाच्या विकासासाठी नियोजन करावे. प्रत्येक गाव सुंदर व सक्षम करण्यासाठी पुढाकार घ्यावा यासाठी शासन आणि जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने मी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.आपल्याला विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. तसेच सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासनही पालकमंत्री शिंदे यांनी दिले.
याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष सुषमा लोणे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, लोकसहभागातून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची अंमलबजावणी ठाणे जिल्ह्यामध्ये वेळोवेळी धडाडीने राबविल्या जातात. यामध्ये संपूर्ण स्वच्छता अभियान, निर्मळ ग्राम अभियान यांचा उल्लेख करावा लागेल. आणि याचीच उद्दिष्ट साध्य म्हणायचे तर ठाणे जिल्हा परिषदेमधील सर्व ग्रामपंचायती या निर्मळ ग्राम पुरस्काराने सन्मानित झाल्याच्या त्या म्हणाल्या. उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी आगामी काळात या पुरस्कारासाठी गावागावांमध्ये निकोप स्पर्धा व्हायला हवी असे सांगितले. तर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भाऊसाहेब दांगडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्तविक करताना आर.आर. (आबा) पाटील सुंदर गांव योजची उद्दिष्ट स्पष्ट करतानाच गुणवत्तेच्या निकषांवर पुरस्कारांची निवड केल्याचे स्पष्ट केले.




























































