आंदोलने, अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करूनही रस्ता होत नसल्याने संतप्त झालेल्या खालापूरच्या चौक ग्रामस्थांनी शुक्रवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा अडवला. रस्ता कधी होणार ते सांगा, अजून किती वर्ष आम्ही खड्ड्यातून प्रवास करायचा.. असा जोरदार हल्लाबोलच केला. गावकऱ्यांच्या या आक्रमक पवित्र्याने सुरक्षा यंत्रणांची चांगलीच धांदल उडाली. अखेर मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्यानंतर गावकरी मागे झाले आणि पोलिसांनी सुटकेचा निःश्वास टाकला.
इर्शाळवाडी दरडग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी उभ्या केल्या जाणाऱ्या नव्या वसाहतीची पाहणी करण्यासाठी शुक्रवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले होते. त्याचवेळी सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील सोनटक्के यांच्या नेतृत्वाखाली चौक नवीन वसाहतीमधील ग्रामस्थांनी मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवून चौकमधील समस्या व इर्शाळवाडी-मोरबे धरणाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुरवस्थेवरून प्रश्नांचा भडिमार केला. तसेच डम्पिंग ग्राऊंडचा प्रश्न तत्काळ सोडवावा अशी मागणी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रस्ता करून देतो असे आश्वासन दिल्यानंतर रहिवाशांनी मुख्यमंत्र्यांना वाट मोकळी करून दिली.
खोके सरकारचा विकास टीव्ही, वर्तमानपत्रातच
विधानसभा निवडणुकांवर डोळा ठेवून खोके सरकार हजारो कोटींच्या घोषणा जाहीर करत आहे. त्याच्या प्रसिद्धीसाठी पुन्हा कोट्यवधींची जाहिरातबाजी केली जाते. मात्र मिंध्यांचा हा विकास फक्त टीव्ही, रेडिओ आणि वर्तमानपत्रांच्या पानांवरच दिसत असून आजही कर्जत-खालापूरमधील आदिवासींना झोळी करून रुग्णालयात आणावे लागत असल्याचा संताप व्यक्त होत आहे.