सुनेगांव शेंद्री ग्रामस्थ मतदान बहिष्कारावर ठाम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । अहमदपूर

अहमदपूर तालुक्यातील सुनेगांव ग्रामस्थांनी रस्त्याच्या कारणामुळे लोकसभा मतदानावर बहिष्कार घातला असून अहमदपूर तालुक्यातील ६६० मतदार असलेल्या या गावातील एकाही मतदाराने मतदान केले नाही. रस्ता होत नसल्याने मतदारांनी बहिष्कार घालून प्रशासनाचा निषेध व्यक्त केला.

अहमदपूर तालुक्यातील सेंद्री (सुनेगाव) हे जवळपास १२०० लोकसंख्या असलेले गाव आहे. या गावात एकूण ६६० मतदार आहेत. या गावच्या ग्रामस्थांना तालुक्याला येण्यासाठी ५ कि.मी. अंतरासाठी १५ ते २० किलो मीटरचा रस्ता पार करावा लागत आहे. अशी गावक-यांची गेल्या २५ वर्षापासूनची रस्त्याची मागणी आहे. सेंद्री, सुनेगाव व शेणी या तीन गावांची ग्रुप ग्रामपंचायत असून, आनंदवाडी गावातून मन्याड नदीवर पूल बांधून रस्ता करण्याची मागणी सातत्याने गावकरी करीत आहेत.

माजी आ. बबुवान खदाडे यांच्या काळात पुलाचे काम झाले. परंतु रस्ता झाला नाही. विद्यमान आ. विनायकराव पाटील यांच्याकडेही गावक-यांनी रस्त्याची मागणी केली. काही शेतक-यांच्या शेतातून हा रस्ता जातो. त्यांची या रस्त्याला हरकत होती. त्यामुळे आमदार पाटील यांनी गावकरी आणि शेतमालकांची बैठक घेऊन समजूत घालण्याचा प्रयत्न केला. परंतु, संबंधित शेतमालकाने रस्त्यासाठी जमीन दिली नाही. त्यामुळे रस्त्याचा प्रश्न जैसे थे आहे. यामुळे गावक-यांनी गुरुवारी लोकसभेच्या मतदानावर बहिष्कार टाकून प्रशासनाचा निषेध केला. सुनेगांव (शेंद्री)गावातील मतदारांचा ‘बहिष्कार असल्याचे समजताच तहसीलदार अरुणा संगेवार, अतिरिक्त मुख्याधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी आश्विनी शेलार, पोलीस निरीक्षक सुनिलकुमार पुजारी यांनी गावास भेट देऊन गावक-यांची समजूत घातली. मात्र गावकरी आपल्याच भूमिकेवर ठाम राहिले. मतदानाची ६.०० ची वेळ संपली तरी एकाही मतदाराने मतदान केले नाही.

सुनेगांव (शेद्री) ग्रामस्थांनी लोकसभा निवडणुकीवरील मतदानावर घातलेला बहिष्कार म्हणजे ग्रामस्थांचा हट्ट असून हा रस्ता मंजूर असून आचारसंहिता संपताच रस्त्याचे काम चालू होणार आहे. – अरुणा संगेवार, तहसिलदार, अहमदपूर

सुनेगांव (शेंद्री) या गावाला जाण्यासाठी रस्ता करण्याची गेल्या ५० वर्षापासून तोंडी मागणी असून २० वर्षापासून लेखी मागणी करण्यात आली आहे. यापूर्वीही जिल्हा परिषद निवडणूकीवर बहिष्कार टाकण्यात आला होता. मात्र गेल्या दोन वर्षात प्रशासनाने रस्ता केला नसून रस्त्याचे काम झाल्याशिवाय मतदान करणार नाही. – नामदेव जायभाये, सरपंच, सुनेगांव (शेंद्री)