
सामना प्रतिनिधी, मालवण
स्वाभिमानच्या दलालांनीच पारंपरिक मच्छीमारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. मच्छिमारांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार ही त्याच विरोधकांचीच खेळी आहे. प्रत्यक्षात शिवसेना-भाजपने नेहमीच पारंपरिक मच्छीमारांच्या हिताचे निर्णय घेतले. एलईडी लाईट मासेमारीवर बंदी आणली. त्यामुळे विरोधकांनी पारंपरिक मच्छीमारांमध्ये कितीही संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरीही येत्या निवडणुकीत उत्स्फुर्त मतदान करत मच्छिमार भगव्यासोबतच आहेत हे दाखवून देतील. असा विश्वास रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे युतीचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केला.
मालवण शहरात रामेश्वर-नारायण व सातेरी देवतांचे आशीर्वाद घेऊन रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ शहरातून प्रचार रॅली काढण्यात आली. तर शिवसेना शाखा येथे तालुका प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी खासदार राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
राऊत म्हणाले, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुतीचे कार्यकर्ते निर्धाराने प्रचारात उतरले असून प्रचंड मताधिक्क्याने निवडून आणण्याचा निश्चय त्यांनी केला आहे. गेल्या पाच वर्षाच्या काळात लोकोपयोगी प्रकल्प मतदार संघात राबविण्यात आले आहेत. केंद्र शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यश मिळाले आहे. त्यामुळे केलेल्या कामाच्या जोरावरच लोकांपर्यंत पोचत आहे. मतदार संघात झालेल्या कामाचे साक्षीदार जनता असल्याने ते मतदानातून दाखवून देतील. पारंपरिक मच्छीमार हे शिवसेनेच्याच पाठीशी राहिले आहेत. त्यामुळे विरोधकांनी या मोठ्या व्होटबँकेत संभ्रमावस्था निर्माण करण्याचे काम केले आहे. तकलादू नेत्यांनी उठविलेली ही राळ आहे. पारंपरिक मच्छीमारांच्या हितासाठीच मी अशासकीय विधेयक मांडले. एलईडीची मासेमारी होता नये अशीच आमची भूमिका राहिली आहे. शिवसेना पक्षप्रमुखांनीही नाणार प्रमाणेच एलईडी मासेमारीही हद्दपार करू असे स्पष्ट केले आहे. पारंपरिक मच्छीमार हे सुज्ञ व जागरूक आहेत. त्यामुळे विरोधकांकडून कितीही संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्यास त्यात त्यांना यश मिळणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले.




























































