रायगडच्या आमदाराला मंत्रिपदाची आशा होती, ती आता मावळली आहे; विनायक राऊत यांचा मिध्यांना टोला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिंदे -फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होऊन त्यात शिंदे गटातील अनेक इच्छूकांना मंत्रीपदे मिळण्याची चर्चा राजकीय वर्तुळात गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे. त्यातच आता अजित पवार समर्थक आमदारांसह सत्तेत सहभागी झाल्याने राजकीय समीकरणे बदलली आहेत. अजित पवार यांच्यासह आलेल्या नऊ आमदारांना मंत्रीपदे मिळाली आहेत. त्यामुळे शिंदे गटातील मंत्रीपदासाठी इच्छुक असलेल्यांची चांगलीच गोची झाली आहे. अजित पवारसोबत आलेल्या आमदारांना मंत्रीपदे मिळाली असून शिंदे गटातील अनेक आमदार अद्याप ताटकळत आहेत. त्यामुळे शिंदे गटावर सातत्याने टीका होत आहे. आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) खासदार विनायक राऊत यांनीही मिंध्यांना चांगलाच टोला लगावला आहे.

खासदार विनायक राऊत म्हणाले, शिंदे गटाच्या आमदारांचा आता भ्रमनिरास झाला आहे. मंत्रीपदाची त्यांची उरली सुरली आशाही आता मावळली आहे. रायगडच्या आमदाराला मंत्रीपदाची आशा होती, ती आता मावळली आहे, अशा शब्दांत विनायक राऊत यांनी नाव न घेता आमदार भरत गोगावले यांना टोला लगावला आहे. आपल्याला मंत्रीपद मिळेल तसेच रायगडचे पालकमंत्रीपद आपल्यालाच मिळायला हवे, अशी गोगावले यांची मागणी होती. मात्र, अजूनही ते मंत्रीपदाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांना मंत्रीपदाने हुलकावणी दिली आहे. त्यावर विनायक राऊत यांनी गोगावले यांना टोला लगावला आहे.

शिंदे गटातील आमदारांना मंत्रीपद मिळण्याची आशा मावळली आहे. कारण, अजित पवार गटाचा भस्मासूर शिंदे गटाच्या बोकांडी बसला आहे. त्यामुळे शिंदे गटातील नेत्यांना आता भविष्य राहिलेले नाही. त्यांच्यासमोर राजकीय अस्तित्त्वाचा प्रश्न उभा ठाकला आहे. ही त्या सर्वांची एकप्रकारची राजकीय आत्महत्याच आहे, असे राऊत म्हणाले आहेत.