इंधन दरवाढीवरून फ्रान्समध्ये हिंसक आंदोलन, सरकार आणिबाणीची लावण्याच्या तयारीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पॅरिस

फ्रान्समध्ये इंधन दरवाढी विरोधात सुरु असलेल्या आंदोलनाने उग्र रुप धारण केले आहे. शनिवारी पॅरिसमध्ये झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. पोलीस आणि आंदोलकांमध्ये झालेल्या संघर्षात जवळपास 110 पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. या हिंसाचाराप्रकरणी 300 हून अधिकआंदोलकांना पोलिसांनी अटक केली आहे. देशात कायदा आणि सूव्यवस्थेचा प्रश्न बिकट झाल्यामुळे देशात लवकरच आणिबाणी घोषीत करण्याचे संकेत फ्रान्स सरकारने दिले आहेत.

फ्रान्समध्ये इंधन दरवाढीविरोधात नागरिकांचा रोष दिवसेंदिवस वाढत चालला आहे. जागतिक पातळीवर इंधनाच्या किंमतीत चढ-उतार होत आहेत. मात्र फ्रान्समध्ये गेल्या वर्षभरात इंधनाच्या किंमती सतत वाढत आहेत. त्यामुळे नागरिकांचा सरकार विरोधात रोष आहे. इंधन दरवाढीविरोधात याअगोदर 17 नोव्हेंबर रोजी झालेल्या आंदोलनात देशभरातील जवळपास तीन लाख नागरिक रस्त्यावर उतरले होते.

शनिवारी झालेल्या आंदोलनात जाळपोळ करणाऱ्या आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला, तसेच  पाण्याचा तीव्र मारा केला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आंदोलक जखमी झाले. युरोपच्या रेडिओ-1 ला दिलेल्या मुलाखतीत “आम्ही या प्रकरणात योग्य पावले उचलत आहोत. अशा घटना पुन्हा होणार नाहीत याची काळजी घेतली जाईल. मात्र प्रत्येक आठवड्याला आंदोलकांना हिंसा आणि ठिय्या आंदोलन करण्याची परवानगी दिली जाणार नाही” असे फ्रन्स सरकारचे प्रवक्ते बेंजामीन ग्रीवो यांनी म्हटले आहे.