
आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱया विराट कोहलीने अखेर 49 महिन्यांनंतर आपली शतकांचा दुष्काळ संपवत शतक साजरे केले. त्याच्या 63 चेंडूंतील 100 धावांच्या खेळीने बंगळुरूला हैदराबादवर आठ विकेट्सनी विजय मिळवून दिला आणि आपल्या प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या.
आयपीएलमधून बाद झालेल्या हैदराबादने हेन्रीक क्लासेनच्या 51 चेंडूंतील 104 धावांच्या झंझावातामुळे 5 बाद 186 धावांची जबरदस्त मजल मारली होती. क्लासेनने या खेळीत 6 षटकार आणि 8 चौकार खेचले होते. त्याने कर्णधार एडन मार्करमबरोबर 76 तर हॅरी ब्रुकबरोबर 74 धावांची भागी रचत संघाला ही दमदार धावसंख्या उभारून दिली होती. पण हैदराबादच्या 188 धावांच्या आव्हानाचा बंगळुरूच्या सलामीवीरांनीच पाठलाग केला. कोहलीने आज 49 महिन्यांनंतर आयपीएलमध्ये शतक साजरे केले. 62 व्या चेंडूवर षटकार खेचून सहावे शतक ठोकणारा कोहली सलग षटकार खेचण्याच्या प्रयत्नात पुढच्याच चेंडूवर बाद झाला. त्याआधी कोहलीने फाफ डय़ु प्लेसिससह 172 धावांची भागी रचली. फाफसुद्धा 71 धावांवर बाद झाला. मात्र मॅक्सवेल आणि ब्रेसवेल यांनी चार चेंडूआधी संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. या विजयामुळे बंगळुरूचे आव्हान कायम राहिले असून त्यांचे भवितव्य साखळीतील शेवटच्या सामन्याच्या निकालावर अवलंबून असेल.
विराट विक्रम
विराटचे 49 महिन्यांनंतर आयपीएलमध्ये शतक. याआधी 19 एप्रिल 2019 मध्ये कोलकाताविरुद्ध इडन गार्डन्सवर 100 धावा केल्या होत्या. तसेच कोहलीने 2016 साली चार शतके ठोकली होती.
आयपीएलमध्ये विराटचे सहावे शतक. ख्रिस गेलच्या विक्रमी सहा शतकांची बरोबरी साधली. गेलने 142 सामन्यांत ही कामगिरी केलीय तर कोहलीने 237 व्या सामन्यात याची बरोबरी साधली.
डय़ु प्लेसिस आयपीएलच्या एका हंगामात 700 पेक्षा अधिक धावा करणारा आठवा फलंदाज ठरला. विराट कोहलीने 2016 साली केलेल्या 973 धावा या एका हंगामातील सर्वोच्च धावा आहेत.

























































