
कसोटी आणि एक दिवसीय क्रिकेटमध्ये आयसीसी क्रमवारीत पहिल्या स्थानावर विराजमान असणारा टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ‘रनमशीन’ या नावाने ओळखले जाते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धावांचा पाठलाग करण्यामध्येही विराटला माहीर समजले जाते. गेल्या दशकाभरातील आकडेवारी देखील याला दुजोरा देते.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गेल्या दशकभरात विराट कोहलीने 300 पेक्षा जास्त धावांचा पाठलाग करताना टीम इंडियासाठी मोलाचे योगदान दिले आहे. टीम इंडियाने गेल्या 10 वर्षात 300 पेक्षा जास्त धावांचा यशस्वी पाठलाग दहा वेळा केला आहे. यात कोहलीने 7 शतक आणि एका अर्धशतकाचे योगदान दिले आहे. या दरम्यान त्याची सरासरी होती 141.85 एवढी.
Simply the best pic.twitter.com/KvuyTMTX1M
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) December 22, 2019
रविवारी कटकमध्ये झालेल्या लढतीतही विराटने धावांचा पाठलाग करताना शानदार खेळी केली. विंडीजने विजयासाठी दिलेल्या 316 धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाने विराट कोहलीच्या सर्वाधिक 85 धावांच्या बळावर हा सामना जिंकला. या खेळीदरम्यान विराटने 2019मध्ये क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रमही केला.
मोहम्मद शमी ठरला ‘विकेट्स’चा बॉस; अनोख्या विक्रमासह कपिल देव, आगरकरला मागे सोडले
विराटने 2019 मध्ये एक दिवसीय, कसोटी आणि टी-20 मध्ये मिळून 2455 धावा चोपल्या, तर रोहित शर्माने 2442 धावा चोपल्या. तिन्ही फॉर्मेटमध्ये मिळून विराट आघाडीवर असला तरी एक दिवसीय क्रिकेटमध्ये एका कॅलेंडर इयरमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम रोहितने केला. 2019 मध्ये रोहितने 1490 धावांची नोंद केली, तर विराटच्या खात्यात 1377 धावा जोडल्या गेल्यात.
कॅलिसचा विक्रम मोडला
विंडीजविरुद्धच्या अर्धशतकीय खेळीसह विराट एक दिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा चोपणाऱ्यांच्या यादीत सातव्या स्थानावर पोहोचला. विराटने दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू जॅक कॅलिसचा विक्रम (11579 धावा) मोडला. एक दिवसीय क्रिकेटमध्ये विराटच्या नावावर सध्या 242 लढतीत 59.84 च्या सरासरीने 11609 धावाची नोंद आहे. या यादीत सचिन तेंडुलकर 18426 धावांसह पहिल्या स्थानावर आहे.
‘हिटमॅन’ रोहित शर्माचा भीमपराक्रम, जयसूर्याचा 22 वर्षापूर्वीचा विक्रम मोडला

























































