
हिंदुस्थान आणि इंग्लंड संघात लीड्समधील हेडिंग्ले मैदानावर तिसरा कसोटी सामना सुरू आहे. हिंदुस्थानचा कर्णधार विराट कोहली याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला, मात्र त्याचा हा निर्णय फसला. इंग्लंडच्या संघाने धारधार गोलंदाजी करत हिंदुस्थानच्या संघाला अवघ्या 78 धावांमध्ये बाद केले आणि दिवसअखेर बिनबाद 120 धावा करत कसोटीवर वर्चस्व मिळवले आहे.
सलामीवीर के.एल. राहुल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, कर्णधार विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यासारखे तगड्या फलंदाजांनी इंग्लंडच्या गोलंदाजांपुढे लोटांगण घातले. चेतेश्वर पुजाराच्या खराब फॉर्ममुळे हिंदुस्थानचा संघ चिंतेत आहे, तसेच कर्णधार विराट कोहली देखील गेल्या काही डावांमध्ये मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला आहे.
इंग्लंडच्या दौऱ्यावर विराट कोहली सातत्याने बाहेर जाणाऱ्या चेंडूवर बाद होत आहे. कोहलीच्या खराब फॉर्मचा प्रभाव हिंदुस्थानी संघावरही पडत आहे. या खराब फॉर्ममधून बाहेर पडण्यासाठी कोहलीच्या मदतीला हिंदुस्थानचे माजी खेळाडू सुनिल गावस्कर यांनी धाव घेतली आहे. विराट कोहली याने तातडीने सचिन तेंडुलकर याला फोन करावा आणि खराब फॉर्ममधून बाहेर येण्यासाठी काय करावे, हे विचारावे, असे गावस्कर म्हणाले. सिडनीमध्ये सचिन तेंडुलकर याने जसे केले होते, तसेच विराटनेही करावे आणि कव्हर ड्राईव्ह खेळू नये, असे गावस्कर म्हणाले.
सचिनचा संयम
हिंदुस्थानचा संघ 2003-04 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेला होता. या दौऱ्यात सचिन तेंडुलकर सातत्याने कव्हर ड्राईव्ह खेळताना बाद होत होता. त्यामुळे त्याने सिडनीमध्ये झालेल्या चौथ्या कसोटीत एकही कव्हर ड्राईव्ह न खेळण्याचा निर्णय घेतला. या कसोटीत सचिनने 436 चेंडूंचा सामना केला, मात्र संयम दाखवत एकदाही कव्हर ड्राईव्ह खेळला नाही आणि 248 धावांची दमदार खेळी केली होती.
विराटचा खराब फॉर्म
कर्णधार विराट कोहली गेल्या दोन वर्षापासून खराब फॉर्मध्ये आहे. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने शतक ठोकून आता पावणे दोन वर्षांचा कालावधी उलटला आहे. विराटने आपले अखेरचे कसोटी शतक नोव्हेंबर 2019 मध्ये बांग्लादेशविरुद्ध ठोकले होते. यानंतर गेल्या 10 कसोटीत विराटला शतकी मजल मारता आलेली नाही, तसेच त्याची धावांची सरासरी देखील 25 च्या आसपास आहे.



























































