अपंगत्वावर मात करणारी महिला गुप्तहेर 

>> प्रतीक राजूरकर

वर्जिनिया हाॅल, दुसऱ्या महायुद्धात असाधारण कामगिरी करणारी महिला गुप्तहेर. इंग्लंड आणि दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेच्या सीआयए साठी अधिकृतपणे काम करण्याचा बहुमान वर्जिनिया हाॅलला प्राप्त आहे. अमेरिकेच्या सीआयए संग्राहलयात वर्जिनिया हाॅलला स्थान देऊन सन्मान करण्यात आला आहे. वर्जिनियाच्या शौर्य कथांवर काही चित्रपटांची निर्मिती सुध्दा झाली आहे. शत्रू राष्ट्रांसाठी सर्वात धोकादायक हेर म्हणून दुसऱ्या महायुद्धात वर्जिनियाचा नावलौकिक होता. आपल्या कामगिरीने वर्जिनिया हाॅलने जर्मन सैन्याला सळो की पळो करुन सोडले होते. वर्जिनिया हाॅलला संपविण्यासाठी जर्मनीने अनेक प्रयत्न केले. परंतु जर्मनीला त्यात यश येऊ शकले नाही. हेरगिरीच्या क्षेत्रातील महिला त्यात वर्जिनियाला एक पाय नव्हता. शत्रूच्या गोटात लंगडी महिला गुप्तहेर म्हणून वर्जिनिया प्रख्यात होती.

वर्जिनिया हाॅलचे कुटुंब मूळचे अमेरिकेच्या मेरीलँड प्रांतातील बाल्टीमोर येथील रहिवासी. 6 एप्रिल 1906 साली वर्जिनियाचा जन्म झाला. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती उत्तम होती. अनेक मानांकीत शिक्षण संस्थेत वर्जिनियाचे शिक्षण पूर्ण झाले. फ्रेंच, जर्मन, इटालियन भाषेवर वर्जिनियाचे प्रभुत्व होते. उच्च शिक्षणासाठी वर्जिनिया युरोपला गेली. वर्जिनियाचे एकच ध्येय होते शासकीय सेवेत जाऊन मुत्सद्दी होण्याचे. फ्रान्स, जर्मनी, आॅस्ट्रीया देशात प्रवास करुन वर्जिनियाने आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी  शिक्षण घेतले. 1931 साली वर्जिनियाला पोलंडच्या अमेरिकन दूतावासात नौकरी प्राप्त झाली. मात्र 1932 साली शिकारीला गेली असतांना वर्जिनियाचा अपघात झाला. तिच्याच बंदूकीतून चुकून गोळी सुटल्याने गुडघ्यापासून तिचा पाय काढावा लागला. त्याजागी वर्जिनियाने लाकडी पाय बसवून घेतला. त्याकाळी कृत्रिम पाय आजच्या सारखे व्यवस्थित जुळत नसत. सात पाऊंड वजनाचा लाकूड आणि अँल्युमिनियमचा पाय बसवून वर्जिनियाने त्याला ‘कुथबर्ट’ नाव  दिले. चामड्याच्या पट्टयांनी कृत्रिम पाय कमरेला बांधून वर्जिनिया चालायची. मात्र काही वर्षातच आपल्या परराष्ट्र सेवेतील नौकरीचा राजीनामा द्यावा लागला. परराष्ट्र सेवेत शारीरिक अपंगत्वा मुळे वर्जिनियाला पुढील परीक्षांना बसण्याची परवानगी नाकारण्यात आली. वर्जिनियाचे स्वप्न भंगले होते. त्यामुळे तिने परत आपल्या घरी जाण्याचा निर्णय घेतला. आपल्या कृत्रिम पायाने वर्जिनियाने चालण्याचा भरपूर सराव केला.

1940 साली वर्जिनिया फ्रान्सला गेली. तिथे रुग्णवाहिका चालवण्याचे काम तिने स्वीकारले. जर्मनीने नुकताच फ्रान्सवर हल्ला केला होता. अखेर वर्जिनिया लंडनला स्थलांतरित झाली. अमेरिका महायुद्धात अद्याप सहभागी झाला नव्हता. परंतु ब्रिटिश पंतप्रधान चर्चिल यांनी विशेष कृती दल स्थापन करुन युध्दातील सैनिकांना भूमिगत राहून मदत करण्याची योजना आखली होती. वर्जिनियाचे विविध भाषांवरील प्रभुत्व आणि तिची समर्पित वृत्ती बघता विशेष कृती दलात वर्जिनियाला पहिली महिला म्हणून नियुक्ती मिळाली. वर्जिनियाला विशेष कृती दलात फ्रान्सला पाठवण्यात आले. खोटे नाव, खोटे दस्तावेजांच्या आधारावर वर्जिनिया हेरगिरी करु लागली. न्यूयॉर्क टाईम्सची पत्रकार म्हणून वर्जिनिया आपली हेरगिरी करत होती. 1941 साली वर्जिनियाने आपले मुख्यालय स्थापन केले. तिथून ती फ्रान्सच्या आर्थिक, राजकीय, युध्दाच्या घडामोडी जिओलाॅजिस्ट या सांकेतिक नावाने इंग्लंडला पाठवायची. पुढे वर्जिनियाने अनेक कुशल हेर हेरून कृती दलात नियुक्त केले.

नियुक्त केलेल्या हेरांच्या मदतीने वर्जिनियाने अनेक मोहिमा पार पाडल्या. वर्जिनियाने 90 हेरांची एक तुकडी दक्षिण फ्रान्स भागात उभारली. त्यांच्या माध्यमातून वर्जिनिया जर्मन सैनिकांचा शस्त्रसाठा, हालचाल, मार्सेल्स बेटावरील पाणबुड्यांचा निर्माण होत असलेला तळ, याबाबत माहिती गोळा करुन तारेने आपल्या वरिष्ठांना कळवत होती. पुढे वर्जिनियावर अधिक जबाबदारी येऊ लागली. संयुक्त राष्ट्रांच्या सैनिकांना प्रत्यक्षात मदत करण्याचे काम तिने स्वीकारले. आपले हेर वाढवून वर्जिनियाने पॅराशूटने जमिनीवर येणाऱ्या सैनिकांना सुरक्षित स्थळी नेणे, त्यांना पैसा, शस्त्र, औषधांचा पुरवठा करणे या जोखमीच्या मोहिमा यशस्वीपणे राबवल्या. वर्जिनियाचे कौशल्य आणि यश बघता तिच्या वरिष्ठांनी अनेक मोठ्या जबाबदाऱ्या दिल्या. तुरूंगातून संयुक्त राष्ट्रांच्या सैनिकांना पलायन करण्यास मदत करणे, जखमी सैनिकांचे एक गुप्त रूग्णालय वर्जिनियाने उभे केले होते. विशेष कृती दलाच्या कागदपत्रांवरुन असे दिसते की फ्रान्स मधील प्रत्येक इंग्रज सैनिकाला काहीतरी मदत वर्जिनिया व तिच्या तुकडी कडून झालेलीच आहे. परंतु हे सगळं करत असतांना वर्जिनिया करत असलेली मदत शत्रू जर्मन सैन्यातील अधिकाऱ्यांच्या कानावर आलीच. जर्मन सैन्यातील अधिकाऱ्यांना वर्जिनियाचे खरे नाव व नागरिकत्व मात्र माहिती नव्हते हे वर्जिनियाचे मोठे यश होते. जर्मन सैन्याचा एक विभाग असलेल्या गेस्टापोने जाहीर केले की लंगड्या महिलेला पकडण्यासाठी ते कुठल्याही थराला जाण्यास तयार आहेत. गेस्टापो विभागाने वर्जिनियाला पकडून देणाऱ्यास बक्षीस जाहीर केले. जर्मनीच्या ब्रिटिश गुप्तहेरांच्या विरोधातील मोहिमेमुळे 400 पैकी 25% गुप्तहेर परत आलेच नाहीत.

जर्मन सैन्याने अनेक ब्रिटिश गुप्तहेरांना पकडले होते व अनेकांना ठार केले होते. दीड वर्ष वर्जिनियाने सतत आपल्या नेतृत्वात संयुक्त राष्ट्रांच्या सैन्यांना शक्य ती मदद पोचवली होती. अनेक हेर पकडल्या अथवा मारल्या गेले होते. जर्मन सैन्याला विशेष कृती दलाच्या गुप्त मोहिमा रोखण्यात मोठे यश प्राप्त होत होते. वर्जिनियाला संपर्क करतांना अनेक अडचणी येत होत्या. अखेर सप्टेंबर 1942 ला वर्जिनियाने लंडनला निरोप पाठवला. माझ्यावर जर्मन सैन्य पाळत ठेऊन आहे. इथली परिस्थिती कोलमडली असल्याने माझी वेळ कदाचित संपली आहे. त्यानंतर सुध्दा वर्जिनियाने दोन सैन्य अधिकाऱ्यांना तुरूंगातून सोडवण्यासाठी दोन महिने स्वतःला सुरक्षीत ठेवत प्रयत्न सुरूच ठेवले. वर्जिनियाला फ्रान्स मधून निघणे अवघड होते. जर्मन सैन्यचा प्रभाव प्रचंड वाढला होता. अखेर नोव्हेंबर 1942 साली वर्जिनियाने फ्रान्स मधून पायी निघण्याचे निश्चित केले. आपल्या दोन सहकाऱ्यांना घेवून वर्जिनिया फ्रान्सच्या बर्फाच्छादित प्रदेशातून स्पेनला 12 नोव्हेंबर 1942 रोजी निघाली. थंडीने निच्चांक गाठला होता परंतु 7500 फुट उंचीवरून बर्फाळ प्रदेशात सतत दोन दिवस पायी प्रवास करुन वर्जिनिया स्पेनच्या दिशेने पुढे जात होती. एक लाकडी पाय, बर्फाळ पर्वतीय प्रदेश असे 50 मैलांहून अधिक अंतर वर्जिनियाने पार केले. दरम्यान ती वायरलेसवरुन आपल्या मुख्य कार्यालयात संपर्क ठेऊन होती. तिचा डावा पाय प्रवासात अडचणीचा ठरत होता. तिने आपल्या कार्यालयात माहिती देतांना कळवले ‘कुथबर्ट’ ( डावा कृत्रिम पाय) त्रास देतो आहे. तिला उत्तर आले त्याला संपवून टाका. कार्यालयात तिचा ज्या व्यक्ती सोबत संपर्क झाला त्याला तिच्या कृत्रिम पाया बाबत कल्पना नसल्याने असे निर्देश देण्यात आले होते. पर्वतावरून चालतांना वर्जिनिया आपल्या शरीराचे वजन पूर्णत: उजव्या पायावर टाकत होती. स्पेनला पोचल्यावर बार्सिलोनाच्या रेल्वेत बसण्यासाठी वर्जिनिया पोहोचली. सॅन जुआन डे स्टेशनवर वर्जिनियाला स्पेन पोलिसांनी अवैधपणे स्पेन मध्ये घुसखोरी केल्यामुळे अटक केली. स्पेन मित्र राष्ट्र असक्याने वरिष्ठांना संपर्क झाल्यावर वर्जिनियाची सुटका करण्यात आली.

स्पेनला सुटका झाल्यावर वर्जिनियाने वरिष्ठांकडे परत फ्रान्सला जाण्याची परवानगी मागितली. परंतु ती नाकारण्यात आल्याची नोंद आढळते. परंतु 1944 साली वर्जिनिया परत फ्रान्सला आली ती अमेरिकेच्या नियोजन तुकडीत (Strategic Forces). संयुक्त राष्ट्र सैन्यासाठी वर्जिनियाने अनेक योजना अंमलात आणल्या. युद्धानंतर 40 वर्षीय वर्जिनिया गुप्तचर यंत्रणेतच कार्यरत होती. इटालियन भाषेवरील प्रभुत्व असल्याने तिला इटलिला नियुक्त करण्यात आले. अनेक वर्ष तिथे वर्जिनियाने कम्युनिस्ट चळवळीची माहिती गोळा करुन वरिष्ठांना पाठवली. 1950 साली वर्जिनियाने अमेरिकन गुप्तहेर पाॅल गोईलाॅट सोबत विवाह केला. डिसेंबर 1951 साली अमेरिकेच्या सीआयए गुप्तचर यंत्रणेत वर्जिनियाची नियुक्ती करण्यात आली. आपल्या पती समवेत पुढे 15 वर्ष वर्जिनिया सीआयए विशेष कृती विभागात कार्यरत होती. सीआयएतील गुप्त मोहिमा आखण्यात वर्जिनियाचे मोठे योगदान राहिले आहे.

फ्रान्स सैन्याचे जनरल जोसेफ यांनी वर्जिनियाला 1945 साली तिच्या अतुलनीय सेवेसाठी सन्मानित केले. दुसऱ्या महायुद्धात हा सन्मान प्राप्त करणारी ती एकमेव महिला ठरली. फ्रान्सच्या राष्ट्रपतींनी वर्जिनियाला एका मोठ्या समारंभात मेडल देऊन गौरव करण्याचे नियोजित केले होते. परंतु वर्जिनियाच्या आग्रहाखातर तिला साध्या समारंभात गौरविण्यात आले. वर्जिनिया गुप्तचर विभागात असल्याने तिची तशी इच्छा होती त्याचा सन्मान ठेवला गेला.  वर्जिनियाला ब्रिटिश साम्राज्याची सदस्य ( मेंबर आॅफ द आॅर्डर आॅफ द ब्रिटिश एंपायर) हा बहुमान देण्यात आला. फ्रान्सने Croix de Guerre ह्या पुरस्काराने वर्जिनियाचा गौरव केला. 2006 वर्जिनिया जन्म शताब्दी निमित्त फ्रान्स व ब्रिटिश राजदूतांनी वाॅशिंगटन येथे वर्जिनियाच्या कार्याचा गौरव करुन तिच्या स्मृतींना उजाळा दिला. 2016 साली सीआयए गुप्तहेर प्रशिक्षण केंद्राला वर्जिनियाचे नाव देण्यात आले आहे. 8 जुलै 1982 साली वर्जिनियाचे आपल्या जन्मगावी निधन झाले.

वर्जिनियाचे कार्य विशिष्ट देशाची नागरिक म्हणून न बघता एक महिला गुप्तहेर म्हणून निश्चितच कौतुकास्पद ठरते. आपल्या अपंगत्वावर मात करुन युध्दाच्या परिस्थितीत वर्जिनियाने दाखवलेले शौर्य अतुलनी ठरते. वर्जिनियाचा एक पाय निकामी असूनही त्या काळी ती आपल्या राष्ट्राच्या सैनिकांच्या मदतीला प्रत्येक परिस्थितीत धावून गेली. कुठेही हतबल न होता मिळेल ती जबाबदारी वर्जिनियाने  यशस्वीपणाने पार पाडली. गुप्तहेर असल्याने वर्जिनियाने माध्यमांना मुलाखती देणे अथवा आपल्या कार्याबाबत फारशी कुणासोबतच चर्चा केलेली नाही. तिने स्वतःला मर्यादा घातल्या होत्या. आप्त स्वकीयांना सुध्दा तिच्या गुप्तचर म्हणून फार माहिती नाही. गुप्तहेरांच्या इतिहासात वर्जिनिया हाॅल हे नाव एक शूर महिला गुप्तहेर म्हणून कायम स्मरणात असेल.

आपली प्रतिक्रिया द्या