
>> विठ्ठल काळे
पुस्तकं हा शाळेपासूनचा आपला आवडता भाग. पण माझं खरं वाचन सुरू झालं ते कॉलेजच्या वर्षांमध्ये. नाटक हा माझा कायम आवडता विषय. त्यामुळे अगदी सुरुवातीपासूनच गिधाडे, प्रेमा तुझा रंग कसा, पुलंची वेगवेगळी नाटकं असं वाचन होत होतं. त्यानंतर ‘कोसला’ वाचलं. नेमाडेंच्या साहित्याची भूल पडणं म्हणजे काय हे तेव्हा उमजलं.
वेगवेगळ्या प्रकारचे वाचन झाले. त्यात आवडलेले लेखक म्हणजे जीए! त्यांची पुस्तकं वाचताना आपण वेगळ्या जगात हरवून जातो. पुढे भाऊ पाध्ये यांची पुस्तकं आवडू लागली. त्यासोबतच समकालीन वैचारिक वाचनही केलं. त्यावेळी वाचलेलं अण्णाभाऊ साठे यांचं ‘फकिरा’ हे पुस्तक मनावर कोरलं गेलं. असंच कायम वाचावं असं वाटणारं वीणा गवाणकर यांचं ‘एक होता कार्व्हर.’ समर्पण, चिकाटी याचा शब्दश अर्थ जाणून घ्यायचा असेल तर हे पुस्तक वाचलंच पाहिजे. अनंत सामंत यांचं एम.टी. आयवा मारू, नारायण सुर्वे यांचं ‘माझं विद्यापीठ’ अशी स्वतला प्रगल्भ करणारी पुस्तकं वाचली पाहिजेत.
आपण आपल्या आवडीचं वाचन करतोच, पण ते एकसुरी होऊ शकतं. म्हणूनच मला इतरांनी सुचवलेली, दिलेली पुस्तकं वाचायलाही आवडतं. नुकतंच मला अभिनेता सयाजी शिंदे यांनी गोष्ट पैशापाण्याची हे प्रफुल्ल वानखेडे यांचं पुस्तक दिलं. पैसा, त्याचे नियोजन, गुंतवणूक या गोष्टी किती महत्त्वाच्या आहेत हे सांगणारं हे पुस्तक आहे. व. पु. काळे, पुलं हे सगळ्यांचे आवडते लेखक तसेच माझेही. या लेखकांचं लेखन, त्यातली वाक्ये मनाला स्पर्श करतात. एका बाजूला दिलासा देतात, हसवतात तर कधी कान पकडून वाकवतातही. इंग्रजी साहित्याचा अभ्यास करताना शेक्सपिअरची पुस्तकं वाचताना गढून जाणं म्हणजे काय हे अनुभवलं. क्लासिक इंग्रजी साहित्य वाचताना ‘वेटिंग फॉर गोदो’ वाचलं. त्यानंतर मी आल्बर काम्यू यांची बरीच पुस्तकं वाचली. हिंदुस्थानी इंग्रजी लेखकांमध्ये आवडणारे लेखक म्हणजे अरविंद अडिगा आणि अरुंधती रॉय.
इंग्रजीसोबत हिंदी साहित्य हाही आवडीचा आणि जिव्हाळ्याचा विषय. भवानीप्रसाद मिश्र, हरिवंशराय बच्चन यांचं साहित्य, ईस्मत चुगताई, मंटो, प्रेमचंद मुन्शी यांच्या कथा अत्यंत आवडीच्या. प्रेमचंद यांचं ‘गोदान’ मी कितींदा तरी वाचलं असेन. मनाच्या जवळ जाणाऱया या कथा आहेत. मंटो यांच्या नंगी आवाजे, ठंडा गोश्त या आवडत्या कथा. हे सगळे लेखक काही काळासाठी आपला भवताल बदलून टाकतात. अशाच पठडीतले आणखी एक लेखक म्हणजे एस.एल. भैरप्पा. त्यांचं आवरण वाचताना आपण त्या कादंबरीच्या केंद्रस्थानी असल्यासारखं भासतं. इतकं तरल आणि तितकंच ठाशीव असं त्यांचं लेखन आहे. सहजसोपं संवाद साधणारं सुधा मूर्ती यांचे लेखनही म्हणूनच आवडतं.
असा तरलतेचा आणि तितकाच टोकदार अनुभव देणाऱया नागराज मंजुळे, हेमंत दिवटे यांच्या कविता म्हणूनच आपल्या वाटतात. आपपरभाव न ठेवता संवाद साधणारं लेखन आरपार जातं. कुठलाही भेद न ठेवता. पुस्तकंही तशीच असतात आपुलकीच्या प्रवासातील संवादक.
शब्दांकन – शुभांगी बागडे





























































