मुंबई, नाशिक महापालिका पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवार विजयी

3122

मुंबई महापालिकेच्या मानखुर्दमधल्या 141 क्रमांक प्रभागासाठीच्या झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या विठ्ठल लोकरे यांचा विजय झाला आहे. त्यांनी भाजपच्या बाळू पांचाळ यांचा 1385 मतांनी पराभव केला.

नाशिक महापालिकेच्या एका प्रभागासाठी झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्याच मधुकर जाधव यांचा विजय झाल्याचे कळते आहे. त्यांनी मनसेच्या दिलीप दातीर यांचा पराभव केला. नाशिकमध्येच प्रभाग 22 मधून महाविकास आघाडीच्या जगदीश पवार यांचा 3388 मतांनी विजय झाला आहे.

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक 7 ब साठी झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत संगीता शेळके यांचा विजय झाला आहे. त्यांनी भाजपच्या कृष्णा म्हासळकर यांचा पराभव केला आहे. संगीता शेळके यांना 1452 मते मिळाली तर म्हासळकर यांना 657 मिळाली होती.

मुंबई महानगरपालिकेच्या मानखुर्द प्रभाग क्रमांक 141मध्ये गुरुवारी झालेल्या पोटनिवडणुकीत 42 टक्के मतदान झाले होते. 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत या प्रभागात 57 टक्के मतदान झाले होते. त्यात 15 टक्क्यांनी घट झाली आहे. मात्र मतदान घटले असले तरी शिवसेनेचे उमेदवार विठ्ठल लोकरे यांचे पारडे जड असल्याचे सुरुवातीपासून सांगितले जात होते. निकाल लागला तेव्हा हा अंदाज खरा ठरला.

पोटनिवडणुकीच्या मतदानासाठी गुरुवारी सकाळपासूनच मतदारांनी मतदान केंद्रांवर रांगा लावल्या होत्या. दुपारी दीड वाजेपर्यंत 25.56 टक्के तर साडेतीन वाजेपर्यंत 32.73 टक्के मतदान झाले. दुपारी साडेबारानंतर मतदारांची गर्दी काहीशी ओसरली होती. दुपारी साडेतीननंतर मतदारांनी पुन्हा मतदानासाठी गर्दी केली. त्यामुळे साडेपाच वाजेपर्यंत म्हणजे मतदानाची वेळ संपेपर्यंत 42 टक्के मतदान झाले होते. एकूण 13 हजार 476 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात 7344 पुरुष तर 6132 स्त्री मतदारांचा समावेश आहे.

आपली प्रतिक्रिया द्या