चला… चला… मतदानाला चला!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हीच ती वेळ शिवशाहीचं सरकार आणण्याची. हीच ती वेळ, मतदानाचे पवित्र कर्तव्य पार पाडण्याची. लोकशाहीच्या युद्धात महायुती आणि आघाडी समोरासमोर उभी ठाकली असून महायुतीचाच विजय होईल असा सर्वच राजकीय निरीक्षकांचा अंदाज आहे. आपलं एक मत शेतकरी, कष्टकरी, महिला, सर्वसामान्यांना त्यांचा हक्क मिळवून देऊ शकतं. चला, चला, मतदानाला चला…नवमहाराष्ट्र घडविण्यासाठी मतदान करा.

महाराष्ट्र विधानसभेसाठी सोमवारी राज्यभरातील 288 मतदारसंघांत 3289 उमेदवारांचे भवितव्य मतदारराजा ठरवणार आहे. मुंबईसह महाराष्ट्रावर वरुणराजा बरसत असतानाही मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहेच. सर्व यंत्रणा सुसज्ज आहेत. आता आवश्यकता आहे ती पावसाची तमा न बाळगता मतदारराजाने मतदान केंद्रावर जाऊन आपला हक्क बजावण्याची. ईव्हीएमवर नोंदवले जाणारे प्रत्येक मत महाराष्ट्राच्या तख्तावर कोण बसणार हे ठरवणार आहे. राज्यभरात तीन लाख तर मुंबईत 40 हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत. मुंबईत 325 मतदान केंद्रे संवेदनशील जाहीर करण्यात आली आहेत.

मोबाईल नेण्यास परवानगी नाही
मतदान केंद्रावर मोबाईल नेण्यास परवानगी नाही. त्यामुळे मतदान केंद्रावर जाताना आपल्यासोबत मोबाईल नाही याची खात्री करूनच जावे.

मतदानाची वेळ
सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत. 6 पर्यंत जे रांगेत असतील त्या सर्वांना मतदान करता येणार आहे.

यापैकी कोणताही पुरावा चालेल…
पासपोर्ट, वाहनचालक परवाना, छायाचित्र असलेले कर्मचारी ओळखपत्र, बँक किंवा पोस्ट ऑफिसद्वारे देण्यात आलेले छायाचित्र असलेले पासबुक, पॅनकार्ड, नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर (एनपीआर) अंतर्गत रेसिस्टेन्स जीन आयडेंटिफायर (आरजीआय)द्वारे दिलेले स्मार्ट कार्ड, मनरेगा कार्यपत्रिका, कामगार मंत्रालयाद्वारे दिले गेलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन दस्तावेज, खासदार/आमदार/विधान परिषद सदस्य यांना दिलेले ओळखपत्र, आधारकार्ड.

पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिह्यात पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. पुणे परिसरातही मोठय़ा प्रमाणात पाऊस सुरू आहे. त्यामुळे अनेक मतदान केंद्रांबाहेर चिखल झाला आहे. काही ठिकाणी पाणी भरले असून ते उपसण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. हीच परिस्थिती पुढील दोन दिवस कायम राहणार आहे. तसेच जळगाव, नाशिक, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, संभाजीनगर येथेही पावसाच्या हलक्या सरी कोसळणार आहेत.