
सामना प्रतिनिधी । अलिबाग
लोकसभा मतदार संघाची मतमोजणी 23 मे रोजी अलिबाग जवळील जिल्हा क्रीडा संकुल नेहुली येथे होणार असून निवडणूक यंत्रणा जय्यत तयारीत आहे. लवकरात लवकर निकाल लावण्याचा प्रयत्न असणार आहे, असे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ विजय सूर्यवंशी यांनी सांगितले आहे.
प्रत्येक मत मोजणीसाठी १४ टेबल्स
6 विधानसभा मतदार संघ निहाय होणाऱ्या प्रत्येक मतमोजणीसाठी प्रत्येकी 14 टेबल असणार आहेत. त्यानुसार एकूण लोकसभा मतदार संघाच्या 156 फेऱ्या होणार आहेत. त्यात सर्वाधिक फेऱ्या 28 महाड आणि सर्वात कमी फेऱ्या 23 गुहागर या विधानसभा मतदार संघाच्या होणार आहेत. 32 रायगड लोकसभा मतदारसंघासाठी अलिबाग, पेण, श्रीवर्धन, महाड, दापोली, गुहागर अशी एकूण सहा विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण 16,51,560 मतदारांपैकी 10,20,140 मतदारांनी मतदान केले आहे. एकूण 61.76 टक्के मतदान झालेले आहे. त्यांची विधानसभा मतदारसंघ निहाय आकडेवारी खालिलप्रमाणे आहे.
विधानसभा केंद्र मतदान फेऱ्या झालेले
मतदार संघ संख्या मतदान
——————————————————————-
191 पेण 375 27 195567
——————————————————————-
192 अलिबाग 377 27 189713
——————————————————————-
193 श्रीवर्धन 351 25 152664
——————————————————————-
194 महाड 392 28 168580
——————————————————————-
263 दापोली 363 26 171907
——————————————————————-
264 गुहागर 321 23 141709
——————————————————————–
एकूण 2179 156 1020140
——————————————————————–
अशी होणार मत मोजणी
मतमोजणी ठीक सकाळी 8 वाजता सुरू केली जाणार आहे. प्रत्येक विधानसभा मतदार संघासाठी 14 टेबल निहाय आराखडा तयार करण्यात आलेला आहे. सर्व विधानसभा मतदार संघातील 84 टेबलनिहाय पहिल्या फेरीची मतमोजणी झाल्यानंतर, दुसरी फेरीची मतमोजणी सुरू करण्यात येणार आहे.
सर्व प्रथम ईटीपीबीएस ( इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलट सिस्टीम) मते बारकोडद्वारे मोजली जाणार आहेत. तसेच पोस्टल बॅलेटद्वारे प्राप्त झालेली मते मोजली जाणार आहेत.
32 रायगड लोकसभा मतदारसंघात ईटीपीबीएसचे एकूण 1405 मतदार व पोस्टल बॅलेटचे एकूण 9399 असे एकूण 10804 मतदार आहेत. त्यापैकी आत्तापर्यंत अनुक्रमे 755 व 4805 असे एकूण 5560 मते प्राप्त झालेली आहेत सर्व प्रथम या मतपत्रिकांची मतमोजणी केली जाणार आहे.
क्रीडा संकुल येथे कडक पोलीस बंदोबस्त असून मतमोजणीच्या दिवशी देखील अधिकृत प्राधिकार पत्र किंवा निवडणूक ओळखपत्र असलेल्या व्यक्तींनाच प्रवेश असणार आहे. उमेदवारांचे प्रतिनिधी, पर्यवेक्षक, मतमोजणी कर्मचारी या सर्वांना आयोगाच्या तसेच जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या निर्देशाचे तंतोतंत पालन करावयाचे आहे
प्रशिक्षण वेगात
सर्व मतदारसंघाची टेबल व फेरी निहाय मतमोजणी, पोस्टल बॅलेट व ईटीपीबीएस यांची मतमोजणी झाल्यानंतर निकाल घोषित केला जाणार आहे. मतमोजणीसाठी आवश्यक अधिकारी/ कर्मचारी यांच्या नेमणुका करण्यात आलेल्या आहेत. सदर मतमोजणी अधिकारी/ कर्मचारी यांना ३० एप्रिल रोजी पहिले प्रशिक्षण देण्यात आलेले असून शनिवार १८ मे रोजी दुसरे प्रशिक्षण आयोजित करण्यात आलेले आहे तसेच मतामोजणीची रंगीत तालीम दिनांक २२ मे रोजी जिल्हा क्रिडा संकुल नेहुली येथे घेण्यात येणार आहे.





























































