
व्यापाऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या नगर अर्बन बँकेच्या 14 जागांसाठी रविवारी मतदान होत आहे. निवडणूक प्रक्रियेची सहकार विभागाकडून तयारी पूर्ण करण्यात आली आहे. सत्ताधारी सहकार पॅनेल आणि अपक्ष असे एकूण 21 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
नगर अर्बन बँकेच्या एकूण 18 जागा आहेत. त्यांपैकी चार जागा बिनविरोध आल्या आहेत. उर्वरित 14 जागांसाठी मतदान प्रक्रिया होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार विभागाकडून निवडणुकीसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. बँक बचाव कृती समितीने निवडणुकीतून माघार घेतल्याने सहकार पॅनेलचे संगीता दीपक गांधी, मनेष दशरथ साठे, मनीषा रवींद्र कोठारी व दिनेश कटारिया असे चारजण बिनविरोध निवडून आले आहेत. मनपा व भिंगार कार्यक्षेत्र मतदारसंघातील 10 जागांसाठी 14, तर महाराष्ट्र कार्यक्षेत्र मतदारसंघात चार जागांसाठी सात उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
दरम्यान, मनपा व भिंगार कार्यक्षेत्र – ईश्वर बोरा, अनिल कोठारी, संपतलाल बोरा, राहुल जामगावकर, राजेंद्रकुमार अग्रवाल, स्मिता महावीर पोखरणा, अनिल गट्टाणी, शैलेश मुनोत, गिरीश लाहोटी, दीप्ती सुवेंद्र गांधी, महेंद्र गंधे, अजय बोरा, संजय डापसे, दीपक गुंदेचा. महाराष्ट्र कार्यक्षेत्र – कमलेश भंडारी, अशोक कटारिया, रमणलाल भंडारी, अतुल कासट, गणेश राठी, सचिन देसर्डा, रज्जाक इनामदार असे 21 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
नगर शहरात भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल, अंबिका विद्यालय केडगाव, आनंद विद्यालय गुलमोहर रोड, आंबेडकर शाळा भिंगार आदी मतदान केंद्रांवर सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. बँकेचे नगरसह पुणे, संभाजीनगर, जालना, नाशिक, बीड व सुरत आदी ठिकाणी कार्यक्षेत्र आहे. बँकेसाठी 55 हजार 991 मतदार आहेत. मंगळवारी (दि. 30) सकाळी 9 वाजता अमरज्योत मंगल कार्यालय, कल्याण रोड येथे मतमोजणी होणार आहे.
प्रशासकराज संपुष्टात येणार
बँकेच्या संचालक मंडळाची यापूर्वी 2014मध्ये निवडणूक झाली होती. या निवडणुकीत स्व. दिलीप गांधी व स्व. सुवालाल गुंदेचा यांच्या पॅनलने बँकेवर निर्विवाद वर्चस्व मिळविले होते. 2019मध्ये निवडणूक अपेक्षित होती. मात्र, रिझर्व्ह बँकेने संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकाची नियुक्ती केली होती. बँकेवर सुमारे दोन वर्षांपासून प्रशासकराज सुरू असून, निवडणुकीनंतर प्रशासकराज संपुष्टात येणार आहे.






























































