
आवंदा चार उन्हाळी पाऊस पडतील…पीक-पाण्याचं बरं हाय…पण युद्ध आनं माणसाच्या मागं भोग वरीसभरतरी कायम राहील, असे भाकित विठोबा-बिरोबा देवाच्या भाकणुकीत झालं आहे. कोरोना संक्रमण काळानंतर तीन वर्षांनी जत्रा भरत असल्याने भाविकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला.
महाराष्ट्रासह उत्तर कर्नाटकमधील धनगर समाजातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱया खटाव तालुक्यातील सिद्धेश्वर कुरोली येथील ताकपीठ माळावरील विठोबा-बिरोबा देवाच्या वार्षिक यात्रेस येरळा नदीकाठावरील भाकणुकीने सुरुवात होते. चालू वर्षीच्या भाकणुकीत पुजारी रामहरी हिरवे यांनी भाकणूक कथन केली. यावेळी त्यांनी चार उन्हाळी पावसाबरोबरच आद्रा, तरणा नक्षत्रांत जेमतेम पाऊस पडेल. म्हातारा काहीतरी करेल, आसळका, मगा, पूर्वा नक्षत्रांत भरपूर पाऊस. उत्तरात रापा नक्षत्र बरं होईल. हत्तीच्या नक्षत्रातही चांगला पाऊस पडेल. गहू, तूर, मटकी, घेवडा, नाचणी, वरी बरी होईल. वाटाणा, हरभऱयाला सवई दीड उत्पन्न निघेल. गहू, ज्वारीचंही पीक बरं राहील. आलं, मिरची, सोयाबीनला दर चांगला राहील. आगामी काळात रोगराई कमी होईल. शेळ्या-मेंढीच्या मागचा भोगही कमी राहील. गाय-वासरू बरं राहील. माणसाच्या मागचा भोग अजून संपला नाही. कोण आलं कोण गेलं याच्या बातम्या समजतच राहणार. युद्ध होईल तसेच अनेक ठिकाणी भगवा फडकेल, असेही भाकीत केले आहे.
या भाकणुकीनंतर ‘विठोबा-बिरोबाच्या नावानं चांगभलं’, ‘तात्यासाहेबाच्या नावानं चांगभलं’ करत मानाच्या सासनकाठय़ा देवालयात नेण्यात आल्या. सुरुवातीला तात्यासाहेब मंदिरासमोर काठय़ा नाचविण्यात आल्या. सायंकाळी धार्मिक विधी व गोड नैवेद्य झाला. रात्री राज्यातील नामांकित गजी मंडळांचे गजीनृत्य कार्यक्रम झाले. दुसऱया दिवशी सकाळी पूजा व धार्मिक कार्यक्रम, तर दुपारपासून बकऱयांचा कार्यक्रम झाला. यात्रेनिमित्त खेळणी-पाळणी व मेवामिठाईची दुकाने मोठय़ा प्रमाणावर आली आहेत.






























































