
वाघजाई क्रीडा मंडळ, (चिपळूण, रत्नागिरी) व शिवशक्ती महिला संघ (मुंबई शहर) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-बाणेर-पुणे व बाबूराव चांदेरे फाऊंडेशन आयोजित राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या अनुक्रमे पुरुष व महिला गटाने जेतेपद पटकाविले. वाघजाई संघाचा अजिंक्य पवार पुरुषांमध्ये, तर शिवशक्तीची सोनाली शिंगटे महिलांमध्ये स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरले. दोघांनाही प्रत्येकी रोख रुपये 25 हजार व घडय़ाळ देऊन गौरविण्यात आले.
म्हाळुंगे, बाणेर-पुणे येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलातील बॉक्सिंग हॉलमधील मॅटवर झालेल्या पुरुषांच्या अंतिम सामन्यात वाघजाईने नांदेडच्या बाबूराव चांदेरे फाऊंडेशनचा चुरशीच्या लढतीत 39-34 असा पराभव करीत कबड्डी महर्षी स्व. शंकरराव (बुवा) साळवी चषक व रोख रुपये एक लाख 50 हजार आपल्या खात्यात जमा केले. उपविजेत्या चांदेरे फाऊंडेशनला चषक व रोख रुपये एक लाखावर समाधान मानावे लागले. मध्यांतराला वाघजाई संघाकडे 28-19 अशी आघाडी होती. वाघजाई संघाच्या अजिंक्य पवार याने चौफेर चढाया करीत बाबूराव चांदेरे फाऊंडेशन संघाचा बचाव भेदला, तर शुभम शिंदे याने उत्कृष्ट पकडी घेत त्यांचे आक्रमण समर्थपणे थोपवले. बाबूराव चांदेरे फाऊंडेशन संघाच्या सुनील दुबिले याने जोरकस चढाया करीत चांगला प्रतिकार करीत सामन्यात चुरस निर्माण केली. गुरुनाथ मोरे याने चांगल्या पकडी घेतल्या, पण विजय मात्र त्यांच्यापासून दूरच राहिला.
महिलांचा अंतिम सामनादेखील शेवटच्या क्षणापर्यंत चुरशीने खेळला गेला. त्यात शिवशक्ती संघाने पुण्याच्या बलाढय़ अशा राजमाता जिजाऊ संघावर 32-26 असा विजय संपादन करीत कबड्डीमहर्षी स्व. शंकरराव (बुवा) साळवी चषक व रोख रुपये एक लाख 50 हजार आपल्या नावे केले. उपविजेत्या राजमाता जिजाऊ संघ चषक व रोख रुपये एक लाखाचा मानकरी ठरला. पहिल्या डावात शिवशक्तीकडे 14-13 अशी निसटती आघाडी होती. शिवशक्ती संघाच्या अपेक्षा टाकळे व सोनाली शिंगटे यांनी चौफेर चढाया करीत मैदानावर हुकमत गाजवीत संघाला विजय मिळवून दिला. त्यांना रक्षा नारकर व रेखा सावंत यांनी उत्कृष्ट पकडीची साथ देत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. अपेक्षा टाकळे व सोनाली शिंगटे यांनी सामन्याच्या सुरुवातीपासूनच आक्रमक चढाया करीत राजमाता जिजाऊ संघाला दबावाखाली ठेवण्यात यश मिळविले. त्याचा परिणाम राजमाता जिजाऊ संघाला पराभवाला सामोरे जावे लागले.





























































