सॅण्डहर्स्ट रोडलगतच्या भिंतीवरून मध्य रेल्वे व म्हाडामध्ये जुंपली

7

सामना प्रतिनिधी । मुंबई

हार्बरच्या सॅण्डहर्स्ट रोड रेल्वे स्थानकातील रूळांवर सोमवारी भिंत कोसळल्याने रेल्वे सेवा बाधित झाली होती. या भिंतीशेजारी जुनी इमारत असून तिच्या पायाखालची माती घसरून या भिंतीवर येत असल्याने म्हाडानेच इमारतीच्या भोवती संरक्षण भिंत बांधावी अशी मध्य रेल्वेने केलेली मागणी म्हाडाने फेटाळून लावल्याने दोन्ही यंत्रणांमध्ये जुंपली असून मधल्यामध्ये प्रवाशांची व नागरिकांची सुरक्षा धोक्यात आली आहे.

मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरील सॅण्डहर्स्ट रोड स्थानकात कल्याण दिशेकडील डाऊन मार्गावरील रूळांवर भिंत कोसळण्याची घटना सोमवार ९ जुलै रोजी घडली होती. या भिंतीच्या कडेला असलेल्या इमारतीच्या पायाखालील माती घसरून भिंतीवर येत असल्याने ही भिंत कोसळत असल्याचे रेल्वेचे म्हणणे आहे.त्यामुळे म्हाडाने आपल्या इमारतीभोवती संरक्षण भिंत बांधावी अशी मागणी मध्य रेल्वेने लावून धरली आहे.

मात्र, म्हाडाने ही इमारत संपूर्ण सुरक्षित असून रेल्वेनेच आपली भिंत मजबूत बांधावी अशी उलटी मागणी केली आहे. रेल्वे आपली संरक्षक भिंत बांधण्यास तयार आहे. मात्र, इमारती भोवती आणखी एक मजबूत भिंत न बांधल्यास रेल्वेच्या भिंतीवर लोड येण्याची रेल्वेला भीती वाटत आहे. त्यामुळे त्रयस्त संस्थेमार्फत या इमारतीच्या मजबूतीचा काय तो सोक्षमोक्ष लावण्यात यावा अशी मध्य रेल्वेची भूमिका असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या