कळव्यातील प्रभाग समिती ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत दुरुस्तीसाठी फरफट मतदार याद्यांमध्ये घोळ; निवडणूक यंत्रणा थंड

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादी जाहीर झाली खरी, पण त्यात असंख्य चुका असल्याचे आढळून आले आहे. दुबार नावे, चुकीचे पत्ते, नियमित मतदान करणाऱ्यांची नावेच गायब, असा घोळ झाला आहे. तरीदेखील निवडणूक यंत्रणा थंड असून याद्यांमधील दुरुस्तीसाठी प्रभाग समिती ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना फरफट करावी लागत आहे. कोणता अर्ज कोणाकडे द्यायचा याची माहितीही स्पष्टपणे मिळत नसल्याने कार्यकर्त्यांची धावाधाव सुरू झाली आहे.

ठाणे महानगरपालिकेतील 20 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध झालेली प्रारूप मतदार यादी पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना दोन दिवस उशिरा मिळाली. त्यात बऱ्याच त्रुटी आहेत. त्याच्या दुरुस्तीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख विजय देसाई यांच्यासह अनेक पदाधिकारी आज कळवा प्रभाग समितीमध्ये गेले होते. मात्र तेथे त्यांचे म्हणणे नीटपणे ऐकून घेतले गेले नाही. प्रभाग समितीमधील कर्मचाऱ्यांना तुम्ही मुख्यालयात जा असे सांगितले. त्यानुसार महापालिकेत जाऊन आयुक्त सौरभ राव यांना निवेदन देण्यात आले.

शिवसेनेच्या शिष्टमंडळाने दिलेले निवेदन आपण जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवणार असल्याचे ठाणे पालिकेतील निवडणूक विभागामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी विजय देसाई यांना सांगितले. मतदार याद्यांमधील घोळाबाबत पालिकेत कोणताही निर्णय होणार नसेल तर धावाधाव तरी कुठे करायची, असा सवाल शिवसेनेने केला आहे. दरम्यान प्रारूप याद्यांमधील त्रुटी लक्षात घेता त्यावर हरकत घेण्यासाठी पुरेसा वेळ मिळणे आवश्यक असून हरकतीची मुदत 30 नोव्हेंबरपर्यंत वाढवावी, अशी मागणी पालिका आयुक्तांकडे करण्यात आली आहे.

या आहेत त्रुटी

कळवा विधानसभा क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 23 मधील 79 क्रमांकाची यादी गहाळ. प्रभाग क्रमांक 31 मधील सहा याद्या छापल्या असल्याचा दावा केला असला तरी प्रत्यक्षात त्या उपलब्ध नाहीत. कळवा शहरातील 50 नागरिकांची नावे गहाळ. स्थलांतरित व दुबार नावे यांचा ताळमेळ नाही.

आधी नाव होते.. आता गायब

शिवसेनेचे खारेगाव येथील उपविभागप्रमुख सुधीर चव्हाण यांचे नाव विधानसभा निवडणुकीच्या वेळी प्रसिद्ध झालेल्या मतदार यादीत 1 हजार 70 क्रमांकावर होते. नुकत्याच जाहीर केलेल्या ठाणे महापालिकेच्या प्रारूप मतदार यादीमध्ये मात्र त्यांचे नावच गायब झाले असल्याचे दिसून आले आहे. यासंदर्भात ते जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करणार आहेत, कळव्याच्या मतदार याद्यांमधील घोळ संपवून त्या निर्दोष असाव्यात यासाठी उपजिल्हाप्रमुख विजय देसाई, लहू चाळके, नंदू पाटील, समीर कदम हे संबंधित अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेत आहेत.