मुंबई वगळता अन्य महापालिकांमध्ये 4 सदस्यीय प्रभाग, महापालिका सुधारणा विधेयक विधानसभेत चर्चेविना मंजूर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्य सरकारने आज महानगरपालिका सुधारणा विधेयक विधानसभेत चर्चेविना मंजूर केले. या विधेयकानुसार मुंबई महानगरपालिका वगळता राज्यातील अन्य महानगरपालिकांमध्ये तीन सदस्यीय प्रभाग रचना रद्द करून ती चार सदस्यीय करण्यात आली आहे. येणाऱया निवडणुकीत ही नवी रचना लागू होईल.

राज्यातील महापालिकांची मुदत संपली आहे. कोरोनामुळे मार्च 2021 मध्ये निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात आली होती. निवडणुकीसाठी लोकसंख्येनुसार तीन सदस्यीय प्रभाग रचना करण्याचा निर्णय त्यावेळी सरकारने घेतला होता. त्यावेळी नगरविकासमंत्री सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे होते. त्यानंतर बहुसदस्य प्रभाग पद्धतीने निवडणूक घेण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यासाठी नगरसेवकांची संख्या वाढवण्यात आली, मात्र सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे महापालिकेच्या निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या.

सर्वांची सोय लावण्यासाठीच; एकनाथ शिंदेंची कबुली
सर्वांची सोय लावण्यासाठी, सर्वांना संधी देण्यासाठी तीन सदस्यीय प्रभाग रचना रद्द करून ती चार सदस्यीय करण्यात आली आहे, अशी जाहीर कबुली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान भवनात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दिली. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महापालिका निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्यासाठीच सरकारने आज घाईघाईने हे विधेयक मंजूर करून घेतले.