अवघ्या 22 दिवसांपूर्वी लग्न झालेल्या दाम्पत्याचा बुडून मृत्यू, वर्धा नदीतून 10 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमरावती जिल्ह्यातल्या वरुड तालुक्यातील बेनोडा शहीद पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या श्री क्षेत्र झुंज येथील वर्धा नदीत नाव उलटून एकाच कुटुंबातील 13 जण बुडाले होते. दुर्घटनेच्या दिवशी तीन जणांचे मृतदेह हाती लागले होते, तर अन्य 10 जणांचा शोध घेण्याचे काम बचाव पथकाकडून सुरू होते.

बुधवारी दिवसभरात एकही मृतदेह हाती लागला नव्हता, मात्र गुरुवारी पहाटेपासून सुरू झालेल्या शोधमोहिमेदम्यान 7 मृतदेह सापडले आहेत. त्यामुळे आतापर्यंत 11 पैकी 10 जणांचे मृतदेह हाती लागले असून एकाचा शोध घेण्याचे काम एनडीआरएफ, आरएफ आणि एसडीआरएफ व डीडीआरएफ पथक करत आहे.

एकाच कुटुंबातील 11 जण गाडेगाव येथील मटरे कुटुंबीयांकडे दशक्रियेच्या विधीसाठी आले होते. दशक्रियेचा कार्यक्रम आटोपल्यानंतर मंगळवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास वरुडकडे फिरायला गेले. त्यावेळी महादेवाच्या दर्शनासाठी वर्धा नदीतून बोटीने जात होते. अचानक नाव उलटली आणि अकराही जण बुडाले. घटनेच्या दिवशीच यातील दोघेजण बचावले आहेत. श्याम मनोहर मटरे (वय – 25) आणि राजकुमार रामदास उईके (वय – 45) या दोघांना पोहायला येत असल्याने ते सुखरुप बाहेर आले.

दुर्घटना घडली त्या दिवशी नारायण मटरे (वय – 45, रा. गाडेगाव), किरण विजय खंडाळे (वय – 28, रा. लोणी), वंशिका प्रदीप शिवनकर (वय – 2, रा. तिवसाघाट) यांचे मृतदेह सापडले होते. तर सात जणांचे मृतदेह गुरुवारी सापडले. निशा नारायण मटरे (वय – 22), पियुष तुळशीदास मटरे (वय – 8), अतुल गणेश वाघमारे (वय – 25), वृषाली अतुल वाघमारे (वय – 20), अश्विनी अमर खंडाळे (वय – 21), रूपाली वाघमारे अशी आज नदीपात्रात मृतदेह सापडलेल्यांची नावे असून अन्य एकाचे नाव अद्याप समोर आलेले नाही. उर्वरित एकाचा शोध अद्याप सुरू आहे.

नवदाम्पत्य बुडाले

दरम्यान, या भीषण दुर्घटनेमध्ये एका नवदाम्पत्याचाही मृत्यू झाला आहे. अतुल वाघमारे (वय – 25) व वैशाली अतुल वाघमारे (वय – 19) अशी दोघांची नावे आहेत. 22 दिवसांपूर्वीच या दोघांचे लग्न झाले होते.