तलाव भरलेले असूनही ऐन दिवाळीत मुंबईत पाण्याची बोंब! शिवसेनेसह सर्वपक्षीय संतप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऐन दिवाळीत मुंबईच्या अनेक भागांत पाणीटंचाई निर्माण झाल्यामुळे नागरिकांमध्ये पालिका प्रशासनाविरोधात प्रचंड संताप व्यक्त होत आहे. दिवाळी सणाची तयारी करायची की पाण्यासाठी वणवण, असा प्रश्न पडत असल्याने नगरसेवकांना रहिवाशांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रार करूनही कोणतीही कार्यवाही होत नसल्याने आज स्थायी समितीत शिवसेनेसह सर्वपक्षीयांनी तीव्र संताप व्यक्त केला. यावेळी पालिका प्रशासनाकडून समाधानकारक उत्तर देण्यात आले नसल्याने स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी झटपट बैठक तहकूब केली.

मुंबईत सद्यस्थितीत सर्व तलावांत समाधानकारक पाणीसाठा असल्याचा अहवाल पालिका प्रशासनाकडून सादर करण्यात आला. मात्र याच वेळी अनेक सदस्यांनी आपल्या विभागात पाणीपुरवठा गेल्या अनेक दिवसांपासून विस्कळीत असल्याचे स्पष्ट केले. विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी तर एका कर्मचाऱयाच्या बदलीमुळे आपल्या विभागात पालिका प्रशासनाने जाणीवपूर्वक पाणीपुरवठा विस्कळीत केला असल्याचा आरोप केला. यात सुधारणा झाली नाही तर पोलिसांत एफआयआर दाखल करणार असल्याचेही ते म्हणाले. पालिका प्रशासनाच्या या भूमिकेचा सर्वच सदस्यांनी तीव्र शब्दांत निषेध केला. सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी रवी राजा यांनी मांडलेल्या झटपट सभा तहकुबीला पाठिंबा जाहीर केला. तलावात पुरेसा पाणीसाठा असताना पाण्याचे नियोजन का कोलमडले आहे, असा सवाल केला. यावेळी शिवसेनेचे नगरसेवक विजय शिंदे, आरोग्य समिती अध्यक्षा राजुल पटेल, शिक्षण समिती अध्यक्षा संध्या दोशी, प्रभाग समिती अध्यक्षा सुजाता पाटेकर, हरीश भांदिर्गे, राष्ट्रवादीच्या राखी जाधव, भाजपचे प्रभाकर शिंदे, भालचंद्र शिरसाट, ज्योती अळवणी, राजश्री शिरवाडकर, विनोद मिश्रा, आसिफ झकेरिया, जावेद जुनेजा आदींनी प्रशासनाचा निषेध करीत आपापल्या विभागातील पाण्याची समस्या मांडली.

2 नोव्हेंबरचा तलावांतील पाणीसाठा

तलाव          पाणीसाठा (दशलक्ष लिटरमध्ये)

अप्पर वैतरणा    225601

मोडक सागर     94593

तानसा             131789

मध्य वैतरणा     191713

भातसा             681645

विहार              25389

तुलसी              7383

तीन वर्षांतील 2 नोव्हेंबर

रोजी सर्वाधिक साठा

वर्ष     पाणीसाठा टक्केवारी

2021   1358112   93.83

2020   1341601   92.69

2019   1351174   93.35

तलावात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असताना केवळ नियोजनाच्या अभावामुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याचे निदर्शनास येत आहे. मात्र नगरसेवकांना नागरिकांच्या संतापाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे संतापाचा उद्रेक होण्याआधी प्रशासनाने याबाबत तातडीने कार्यवाही करावी.

n यशवंत जाधव,

स्थायी समिती अध्यक्ष