जायकवाडीची आवक मंदावली, पाणीसाठा 90 टक्क्यांवर

828

पावसाने विश्रांती घेतल्यानंतर नगर, नाशिक जिल्ह्यातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा फ्लो कमी झाल्याने जायकवाडी धरणात दाखल होणाऱ्या पाण्याची आवक मंदावली असून, आतापर्यंत जायकवाडी धरणात 90.82 टक्के पाणीसाठा झाला आहे. या धरणाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यातून पाणी सोडले जात आहे. सध्या धरणांत 12 हजार 409 क्युसेकप्रमाणे पाण्याची आवक सुरू आहे.

संभाजीनगर जिल्ह्यासह मराठवाडा विभागावर पावसाची वक्रदृष्टी असली तरीही नगर, नाशिक जिल्ह्यात झालेल्या धुवांधार पावसामुळे जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. नगर, नाशिक जिल्ह्यांतील धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे 12 हजार 409 क्युसेक पाण्याची जायकवाडी धरणात आवक सुरू आहे. हे पाणी नांदुर-मधमेश्वर-7210 क्युसेक, भंडारदरा-1020 क्युसेक, ओझरवेअर-1094 क्युसेक, दारणा-1100 क्सुसेक, वालदेवी-813 क्युसेक आणि पालखेड धरणातून 1522 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

मुळा आणि गंगापूर धरणात सोडण्यात येणारे पाणी बंद करण्यात आले आहे. वरच्या धरणातून येणाऱ्या पाण्यामुळे आजमितीला जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 2709.814 दलघमीवर पोहचला आहे. या धरणातील उपयुक्त पाणीसाठा हा 1971.708 दलघमी असून, टक्केवारी 90.82 झाली आहे. जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने डाव्या आणि उजव्या कालव्यातून पाणी सोडणे सुरू केले आहे. आजमितीला या कालव्यात 1600 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून, जलविद्युत केंद्रातून 1589 क्युसेक प्रमाणे पाणी सोडले जात आहे.

आवक मंदावली
नगर, नाशिक जिल्ह्यातील पावसाचा जोर कमी झाल्याने वरच्या धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग कमी झाला आहे, मुळा, गंगापूरसारख्या मोठ्या धरणातील सोडलेले पाणी बंद करण्यात आले असून, अन्य धरणांतील विसर्ग कमी केला आहे. त्यामुळे जायकवाडी धरणात येणाऱ्या पाण्याची आवक मंदावली आहे. सोमवारी 33 हजार 916 क्युसेक आवक सुरू होती, आज सांयकाळी सहा वाजता ही आवक 12409 क्युसेकवर आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या