पाणीपुरवठा, समस्या आणि पर्यावरणासाठी ‘इस्रायली जलदूत!’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाणीपुरवठा, पाण्याच्या समस्या, वाढत्या नागरिकीकरणाचा परिणाम, प्रदूषण आणि वातावरणातील बदलांबाबत इस्रायलने ‘जलदूत’ म्हणून डॉ. लिओर असाफ यांची दिल्ली येथील दूतावासात नेमणूक केली आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. असाफ यांनी मुंबईला दोन दिवस भेट देऊन विविध विभागांशी चर्चा केली. यामध्ये मुंबई पालिका, राज्य शासन, विद्यापीठे, स्वयंसेवी, विविध संस्थांशी भेटी देऊन आढावा घेतला.

इस्रायलकडून जलतंत्रज्ञांची प्रथमच ही नेमणूक झाली आहे. मुंबई शहर, महाराष्ट्रातील पाणीपुरवठा, सिंचन, जलप्रक्रिया, शुद्धीकरण, निक्षारीकरण, तसेच पूर परिस्थितीचे नियंत्रण अशा विषयांचे आकलन वाढवणे आणि या क्षेत्रात एकत्र काम करण्यासाठी संभाव्य भागीदारांशी भेटीगाठी घेणे समन्वय साधण्याचे काम डॉ. असाफ यांच्या माध्यमातून होणार आहे.

पालिकेच्या भांडुप येथील जलशुद्धीकरण प्रकल्प, कुलाबा सांडपाणी प्रक्रिया पेंद्र, आपत्ती निवारण कक्षाला त्यांनी भेट दिली. मुंबई शेअर बाजार आणि ओआरएफने आयोजित केलेल्या ‘मुंबई-इस्रायल जलसहकार्य’ चर्चासत्रात त्यांनी विचार मांडले. त्यात इस्रायलचे वाणिज्यदूत कोबी शोशानी, मुख्य जलअभियंता अजय राठोर आदी सहभागी झाले होते.

जल व्यवस्थापनासाठी इस्रायलशी सहकार्य वाढणार

डॉ. असाफ यांनी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन आयोग, जलसंपदा विभाग आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या वरिष्ठ अधिकाऱयांच्या भेटी घेऊन राज्याच्या जलव्यवस्थापन क्षेत्राबद्दल माहिती करून घेतली. आगामी वर्षात हिंदुस्थान आणि इस्रायल यांच्यातील राजनैतिक संबंधांना 30 वर्षे पूर्ण होणार आहेत. उभय देशांतील सहकार्यात जल व्यवस्थापनाचे विशेष महत्त्व आहे. हे सहकार्य आणखी मोठय़ा प्रमाणावर वाढणार असल्याचे डॉ. असाफ यांनी यावेळी स्पष्ट केले.