लवकरच योग्य दाबाने नाशिककरांना पाणीपुरवठा होणार

34

सामना प्रतिनिधी । नाशिक

नाशिक महापालिकेच्या वतीने 40 किलोमीटर लांबीच्या पाणीपुरवठ्याच्या वितरण वाहिन्यांचे काम सुरू आहे. आणखी 60 किलोमीटर वाहिन्यांचे काम हाती घेतले जाणार आहे. त्या-त्या भागातील काम पूर्ण होताच नियमित व योग्य दाबाने पाणीपुरवठा सुरू करण्यात येईल. याव्यतिरिक्त कोटय़वधींच्या खर्चातून विविध कामे पूर्ण झाल्यानंतर आणखी दीड लाख लोकसंख्येला पाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे.

गंगापूर धरण व दारणा नदीवरील चेहेडी बंधारा येथील पंपींग स्टेशनद्वारे दररोज 430 ते 435 दशलक्ष लिटर रॉवॉटर 65.44 किलोमीटर लांबीच्या उर्ध्ववाहिनीद्वारे विविध शुद्धीकरण केंद्रात पोहचते. शहरातील शिवाजीनगर, बारा बंगला, पंचवटी, गांधीनगर, नाशिकरोड, निलगिरी बाग या जलशुद्धीकरण केंद्रात पाणी शुद्ध केल्यानंतर 211 किलोमीटर लांबीच्या मुख्य वाहिन्यांद्वारे 103 जलकुंभांमध्ये भरले जाते. तेथून सुमारे 1800 किलोमीटर लांबीच्या वितरण वाहिनीतून विविध व्हॉल्व्सद्वारे ग्राहकांना पाणीपुरवठा करण्यात येतो. महापालिकेने संपूर्ण पाणी वितरण व्यवस्थेचे वॉटर व एनर्जी ऑडिट करून घेतले आहे. यातून या व्यवस्थेत सुधारणा आवश्यक असल्याचे समोर आले. त्यानुसार आता प्रस्तावित कामे सुरू आहेत. सन 2017-18 मध्ये जुन्या वितरीका बदलणे, नवीन पाईपलाईन, जलकुंभांचे बांधकाम, मुकणे धरण पाणीपुरवठा योजनेकरीता 80.38 कोटींची तरतूद होती. त्यापैकी 74.46 कोटी रुपयांची विविध कामे पूर्ण झाली आहेत. 2018-19 मध्ये 18.532 कोटी रुपयांची तरतूद होवून आजपावेतो 42.61 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. उर्वरित कामेही लवकरच मार्गी लागतील. नव्याने निर्माण झालेल्या वसाहतींसाठी पाईपलाईनकरीता 26.70 कोटी रुपयांची कामे निविदा प्रक्रियेत आहेत. महापालिकेमार्फत शासनाकडे 30 कोटींच्या कामांचा प्रस्ताव पाठविण्यात आलेला आहे, अशी माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या