मृगगडावरील पाण्याच्या टाक्या ‘नितळ’ झाल्या; किल्ले संवर्धनासाठी ३० शिलेदारांची मोहीम फत्ते

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मृगगड संवर्धनासाठी ३० शिलेदारांची टीम सरसावली असून गड संवर्धनाचा एक भाग म्हणून मातीने, गाळाने भरलेल्या दोन पाण्याच्या टाक्यांची साफसफाई करण्यात आली. तसेच टाक्यांमध्ये पडलेले दगड बाहेर काढण्यात आले. गडावर पाण्याचे दुर्भिक्ष्य असल्याने प्रथम पाण्याची टाकी साफ करून त्यात पाण्याचा साठा कसा होईल यावर भर देण्यात येत आहे. साफसफाईमुळे मृगगडावरील पाण्याच्या टाक्या ‘नितळ’ झाल्या आहेत.

मृगगड हा सुधागड तालुक्यातील भेलीव गावालगत असणारा डोंगरी गड. याची उंची सुमारे १७५० फूट असून लोणावळा, खंडाळा येथे जाण्यासाठी येथून पायवाटा आहेत. गड आकाराने लहान परंतु गडाची रचना मात्र संरक्षक स्वरूपाची आहे. गडावर पाच ते सहा पाण्याच्या टाक्या असून जुन्या वस्तीचे अवशेष आढळतात. गडकरी परिवार व स्वयंपूर्ण सुधागड या संस्थांच्या स्वयंसेवकांनी १२ एप्रिल रोजी पहाटे गडावर पोहोचून काम सुरू केले. दुपारपर्यंत गाळ काढण्याचे काम पूर्ण करण्यात आले. काम पूर्ण झाल्यावरच स्वयंसेवक गडावरून खाली आले. काही जण फल्याण गावाच्या बाजूच्या वाटेने खाली उतरले. या मोहिमेत सरपंच, शिक्षक तसेच ग्रामस्थांची मदत मिळाली. गड संवर्धन करणाऱ्या टीमने स्थानिकांचे आभार मानले. दोन टाक्यांचे काम पूर्ण झाले असून पुढल्या मोहिमेत तिसरी पाण्याची टाकी साफ करण्याचा मनोदय गडकरी परिवार व स्वयंपूर्ण सुधागडच्या सदस्यांनी व्यक्त केला.

पर्यटकांना आकर्षण
मृगगडावर पाण्याच्या टाक्या, तटबंदी, एक छोटी गुहा आणि गडदेवतेची मूर्ती आहे. पावसाळ्यात धबधबे हे पर्यटकांचे आकर्षण आहे. काही ठिकाणी वाट अरुंद असून कातळात कोरले ल्या पायऱ्यावरून थेट गडावर जाता येते