
मध्य प्रदेशमधील कुनो अभयारण्यामध्ये गेल्या दोन महिन्यांमध्ये सहा चित्त्यांचा मृत्यू झाला आहे. गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी मोठा गाजावाजा करत आफ्रिका खंडातील नामेबिया येथून काही चित्ते हिंदुस्थानमध्ये आणण्यात आले. कोट्यवधी रुपये खर्च करून हे चित्ते हिंदुस्थानात आणण्यात आले. मात्र या चित्त्यांना हिंदुस्थानमधील वातावरणाशी जुळवून घेण्यास अडचण येताना दिसत आहे. याच संदर्भात आता डब्ल्यूडब्ल्यूएफ-इंडियाचे वैज्ञानिक सल्लागार ए.जे.टी. जॉनसिंग (AJT Johnsingh) यांनीही भाष्य केले आहे.
आफ्रिकन खंडातून स्थलांतरित करण्यात आलेल्या चित्त्यांसाठी हिंदुस्थानमध्ये योग्य निवासस्थान अर्थात वातावरण नाही. कुनो अभयारण्य हे अंशत: डोंगराळ, घनदाट वृक्षाच्छादित आणि उच्च तापमान असणारे ठिकाण आहे. एकीकडे कुनोमध्ये सध्या उष्ण तापमान आहे, दुसरीकडे सध्या नामेबियामध्ये हिवाळासदृष स्थिती आहे, असे ए.जे.टी. जॉनसिंग (AJT Johnsingh) म्हणाले. ‘इंडिया टूडे‘च्या एका कार्यक्रमामध्ये ते बोलत होते.
कुनो अभयारण्यामध्ये सध्या चित्त्यांना प्रचंड उष्णतेचा सामना करावा लागत असेल. तिथे बिबट्यांचीही संख्या जास्त आहे. बिबट्या शिकारीमध्ये माहीर असतो, त्यामुळे चित्त्यांना शिकारीसाठी अधिक प्रयत्न करावे लागत असावेत. चित्ता हा नम्र प्राणी असून त्याने लोकांना हल्ला केल्याचे क्वचितच आढळते, असेही ते म्हणाले.
चार पैकी तीन बछड्यांचा मृत्यू
दरम्यान, नामेबियाहून आणण्यात आलेल्या मादी चित्त्याने मार्च महिन्यात चार बछड्यांना जन्म दिला. मात्र यातील तीन बछड्यांचा मृत्यू झाला आहे. पहिल्या बछड्याचा मृत्यू 23 मे रोजी, तर दोन बछड्यांचा मृत्यू 25 मे रोजी झाला. या बछड्यांना उष्माघाताचा त्रास झाला होता. याची माहिती मिळताच कुनोतील तज्ज्ञांनी त्यांना उपचारासाठी दाखल केले, मात्र याचा फायदा झाला नाही.
परदेशातून आणलेले चित्ते सरकारने परत पाठवावेत, ऑल इंडिया जैन जर्नालिस्ट असोसिएशनची मागणी
सहा चित्त्यांचा मृत्यू
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाला नामेबियाहून आणण्यात आलेले 20 चित्ते मध्य प्रदेशमधील कुनो राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात आले होते. यातील तीन चित्त्यांसह तीन बछड्यांचा मृत्यू झाला आहे. सर्वात पहिल्यांदा ‘साशा’ या मादी चित्त्याचा 27 मार्च रोजी मूत्रपिंडाच्या आजाराने मृत्यू झाला. तर, ‘उदय’ हा चित्ता 23 एप्रिलला निश्चल अवस्थेत आढळून आला होता. नंतर त्याचाही मृत्यू झाला. ‘दक्षा’ या मादीचा 9 मे रोजी चित्त्यांच्या झुजीनंतर मृत्यू झाला होता. आता ‘ज्वाला’ या मादीच्या तीन बछड्यांचा मृत्यू झाला आहे.
राजकारण सोडा, ‘कुनो’ नॅशनल पार्कमधील चित्त्यांना राजस्थानात ठेवण्याचा विचार करा

























































