जीव गेला तरी बेहत्तर सर्वेक्षण उधळून लावणार! बारसूत आंदोलकांचा निर्धार; पोलिसांना भिडणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विनाशकारी बारसू रिफायनरी प्रकल्पाचा विरोध टोकाला पोहोचला असून आंदोलकांनी उद्या 28 एप्रिल रोजी प्रकल्पाच्या ठिकाणी माती परीक्षणाच्या नावाखाली सुरू असलेले भू-सर्वेक्षण उधळून लावण्याचा निर्णय घेतला आहे. लाठीचार्ज करा, गोळ्या घाला, मात्र कोकणची राखरांगोळी करणारा प्रकल्प होऊ देणार नाही, असा एल्गार आंदोलकांनी केला आहे. एकीकडे प्रकल्पविरोधी प्रमुख आंदोलकांना तडिपारीच्या नोटीस बजावल्या असताना दुसरीकडे चर्चेचा दिखावा कशाला करता, असा थेट सवाल आंदोलक विचारत आहेत. दरम्यान, उद्याच्या आंदोलनाला संपूर्ण रत्नागिरीसह सिंधुदुर्गातूनही पाठिंबा मिळाला असून सुमारे दहा हजार आंदोलक प्रकल्पावर धडक देत सर्वेक्षण उधळून लावतील, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.

विनाशकारी ‘रत्नागिरी रिफायनरी व पेट्रोकेमिकल प्रकल्प’ नाणारमधून हद्दपार करण्यात आल्यानंतर आता बारसू येथे राबवण्यासाठी सरकारकडून पोलिसी बळाचा वापर करून दडपशाही सुरू आहे. प्रकल्पाला असणारा विरोध मोडून काढण्यासाठी आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या कार्यकर्त्यांना तडिपारीच्या नोटीस बजावून दहशत निर्माण केली जात आहे. मात्र सोमवारी सकाळपासून सुरू झालेले प्रकल्प विरोधकांचे ठिय्या आंदोलन आज चौथ्या दिवशीही सुरू राहिले. सुमारे एक हजार आंदोलकांनी अजूनही प्रकल्पाच्या ठिकाणी ‘तंबू ठोकला’ आहे. यात महिलांची संख्याही मोठी आहे. प्रदूषणकारी रिफायनरी प्रकल्प बारसू, सोलगावमध्ये प्रस्तावित असला तरी याचा परिणाम शिवणे, गोवळ, देवाचे गोठणे, धोपेश्वर परिसरासह संपूर्ण रत्नागिरी-कोकणावर होणार असल्याने हे आंदोलन सुरू आहे.

दिखाव्यासाठी चर्चेचा फार्स

प्रशासनाकडून आतापर्यंत तीन बैठका घेण्यात आल्या त्यात कोणताही तोडगा निघाला नाही. आंदोलकांशी संवाद केला, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या, माहिती दिली, समजावून सांगितले याचा असा केवळ दिखावा सुरू असल्याचे आंदोलक दीपक जोशी यांनी सांगितले.

रिफायनरीविरोधात आज मुंबईत आंदोलन

बारसू-सोलगाव येथे होऊ घातलेल्या रिफायनरी प्रकल्पाविरोधात 28 एप्रिलला संध्याकाळी 6 वाजता दादर पूर्व येथे स्थानकाजवळ कुणबी समाजोन्नती संघ-मुंबई, संलग्न कुणबी युवक मंडळ, कुणबी महिला मंडळ आणि कोकणातील विविध सामाजिक संघटनाच्या वतीने आक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती संभाजी काजरेकर, अरविंद डाफळे यांनी दिली.

पोलिसांचा तळ; जागोजागी छावण्या

बारसू रिफायनरीला विरोध, आंदोलन असताना प्रशासनाने सर्वेक्षण सुरूच ठेवले आहे. यासाठी पोलिसांनी तळ ठोकला असून निवाऱ्यासाठी पक्के तंबू ठोकण्यात आले आहेत, तर कंटेनर्सही दाखल झाले असून सर्वेक्षणाच्या मशनरी जागोजागी दिसत आहेत.

रिफायनरी प्रकल्पाच्या माती सर्वेक्षणाविरोधात प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन सुरू असताना उद्या शुक्रवारी रिफायनरीविरोधात राजापुरात ग्रामस्थांचा महामोर्चा निघणार आहे. मोर्चात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार विनायक राऊत सहभागी होणार आहेत.

दडपशाही आणि कोंडी… आंदोलनस्थळी प्रवेशबंदी

  • आंदोलकांवर अमानुष लाठीचार्ज होऊनही प्रकल्पाच्या ठिकाणी अजूनही एक हजार प्रकल्पविरोधकांचा ठिय्या.
  • आंदोलनातून बाहेर येणाऱ्यांना परत जाण्यास बंदी.
  • सलग चौथ्या दिवशी आंदोलकांचे ठाण. मोबाईल चार्जिंगअभावी बंद पडल्याने संपर्क बंद होत आहे.
  • पोलिसांनी आंदोलकांचे मोबाईल हिसकावले. व्हिडीओ चित्रीकरण, फोटो असल्यास डिलीट केले जात आहेत.
  • या ठिकाणी येणाऱ्या अन्नपाण्याच्या गाडय़ा पोलिसांकडून रोखून आंदोलकांची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

रिफायनरी प्रकल्प निसर्ग, बागायती, मच्छीमारी बुडवणारा प्रदूषणकारी असल्यामुळेच स्थानिकांचा विरोध आहे. मात्र आंदोलनाची दखल न घेता सरकार-प्रशासनाची दडपशाही सुरू आहे. त्यामुळेच उद्या हजारो आंदोलकांसह सुरू असलेले सर्वेक्षण रोखण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

– अमोल गोळे, कोकण अध्यक्ष,रिफायनरीविरोधी संघटना