घनकचरा नव्हे कचऱ्यातून ‘धन’, कल्याणच्या अधिकाऱ्याचा सहावीच्या पुस्तकात धडा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांनी घनकचरा व्यवस्थापनाबाबत राबवलेल्या उपाययोजनांची थेट सीबीएसई बोर्डाने दखल घेतली आहे. सहावीच्या पुस्तकात याबाबतचा धडा घेतला असून मुलांना साध्यासोप्या भाषेत स्वच्छतेचे धडे दिले जाणार आहेत. घनकचऱ्यातून कसे ‘धन’ मिळवता येते याचा वस्तुपाठ घालून देणाऱ्या या अधिकाऱ्याच्या संकल्पनेचा सीबीएसईने गौरव केला आहे.

स्वच्छतेबाबत कमालीचे शिस्तप्रिय, सजग आणि अभ्यासू म्हणून ओळखले जाणारे कोकरे यांनी आतापर्यंतच्या शासकीय सेवेत 30 कोटींहून अधिक रक्कम बक्षीस रुपाने विविध शहरांना प्राप्त करून दिली आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत रुजू झाल्यावर आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या निर्देशानुसार कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात शून्य कचरा मोहीम सुरू केली. कल्याणडोंबिवली परिसर कचरामुक्त होण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. रामदास कोकरे यांनी वेंगुर्ले शहरात कार्यरत असताना राबवलेल्या घनकचरा व्यवस्थापनाची दखल दिल्लीने घेतली असून वेंगुर्ले पॅटर्नच्या धड्याचा समावेश आता सीबीएसई अभ्यासक्रमातील मुलांच्या इयत्ता सहावीच्या पाठ्यपुस्तकात केला आहे.

माथेरानच्या रस्त्याला नाव

माथेरान नगर परिषदेचे उपायुक्त असताना रामदास कोकरे यांनी कचरा विरहित शहर व डम्पिंग ग्राऊंड विकसित केले. माथेरान नगर परिषदने त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून एका रस्त्याला ‘मुख्याधिकारी रामदास तुकाराम कोकरे मार्ग’ असे नाव दिले आहे.