गावाकडचे ‘हवामान खाते’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> दुर्गेश आखाडे

हवामान खात्याच्या पावसाच्या अंदाजापेक्षा बेडकांचं डराव डराव, काजव्यांचं चमचमणं, पिवळा बाहवा फुलणं, विहिरीमध्ये उमळ सुटून झऱयाचा आवाज येणे, गुलमोहर फुलणे, समुद्राचे पाणी लालसर होणे आणि समुद्राची गाज… या पावसाच्या आगमनाची चाहूल देणाऱया पारंपरिक पद्धती आहेत. ग्रामीण भागातील मंडळी याच अंदाजावर आपल्या आगोटची तयारी करतात. ही मंडळी हवामान खात्याच्या भरवशावर न राहता आपल्या ठोकताळय़ांवरच पावसापूर्वीची बेगमी करतात.

पूर्वी गावात राहणाऱया मंडळींकडे ना कॅलेंडर असायचं ना हवामानाचा अंदाज सांगायला कोणी यायचं. मग ही मंडळी काही ठोकताळय़ांवरून हवामानातील बदल आणि ऋतूंचे आगमन ओळखत असत. शेतकरी मंडळींना पावसाच्या आगमनाची प्रतीक्षा असायची आणि पावसाळय़ापूर्वी आगोटची कामे उरकावी लागत. त्यामुळे असे ठोकताळेच त्यांना उपयोगी पडत. त्या वेळी पावसामुळे काही भिजलं, काही नुकसान झालं असं व्हायचं नाही. खरं तर आपल्याकडे पावसाच्या आगमनाची चाहूल देणाऱया अनेक पारंपरिक पद्धती आहेत. निसर्गात होणारे बदलच ऋतू बदलाची चाहूल देतात. जुन्याजाणत्या लोकांनी हे कोठून शोधलं नाही तर निरीक्षणातून जाणलं आणि पुढच्या पिढय़ान्पिढय़ा या ठोकताळ्यांवर अवलंबून राहिल्या आहेत.

आजकाल अनेक गावांमध्ये पावसाळय़ाआधी हे ठोकताळे मांडले जातात. रत्नागिरीतील निवृत्त प्राध्यापक उदय बोडस यांच्या बागेतील कामगार मंडळी गेली ४७ वर्षे ठोकताळय़ांवरूनच पावसाच्या आगमनाची तयारी करतात. उदय बोडस सांगतात की, १९७१ साली आम्ही पोमेंडीमध्ये बाग घेतली. पण शिक्षकी पेशामुळे बागेत कामाला जाणं आणि लक्ष देणं फारसं कोणाला जमत नव्हतं. त्यामुळे आमचे सर्व बागकाम कामगार मंडळींवर अवलंबून असायचे. कामगारच सांगायचे पाऊस जवळ आलाय, खते आणून टाका, शिंपणे करा, आळय़ा करा. तेव्हा आम्ही कुठे कामाला सुरुवात करायचो. त्यांच्या सांगण्यामागे काही ठोकताळे होते. ते आजही आम्ही अनुभवतो.

साधारण रोहिणी नक्षत्राच्या आसपास बागेमध्ये दिंडा आणि आधेलफोक अशी जोडी उगवते. या जोडीच्या उंचीचा गुणाकार केल्यानंतर जे उत्तर येतं तितक्या दिवसांनी पाऊस पडतो, असा एक ठोकताळा आहे. हे गणित मी प्राध्यापक असलो तरी बागेत काम करणाऱया गडय़ांनी मला शिकवलं अशी कबुलीही प्रा. बोडस देतात. आणखी एक निरीक्षण त्यांच्या बागेत ते दरवर्षी करतात. त्यामुळे त्यांच्या घराच्या जवळच्या झाडावर कावळा घरटं बांधतो. या घरटय़ावरूनही पावसाची तीव्रता ओळखली जाते. यंदा कावळय़ाने ३२ फुटांवर घरटं बांधलं आहे. त्यामुळे यंदा पावसाचा जोर कमी असेल. ज्या वेळी कावळा घरटं १८ फुटांवर बांधतो त्या वेळी जोरदार पाऊस आणि २४ फुटांवर बांधतो त्या वेळी मध्यम जोराचा पाऊस असतो असा अनेक वर्षांचा अंदाज आहे.

हवामान खात्याच्या अंदाजापेक्षा बेडकाचं डराव डराव पावसाची लवकर चाहूल देतं. आजकाल बेडकांचा आवाज शहरांतील सिमेंट काँक्रीटच्या जंगलांमध्ये फारसा ऐकू येत नसला तरी गावामध्ये मात्र बेडकांचे डराव डराव पावसाच्या आगमनाची चाहूल देतं. काजवे चमचमू लागले की पाऊस येणार हे निश्चित असतं. काही ठिकाणी मुंग्या माती काढायला लागतात, हासुद्धा पावसाच्या आगमनाचा एक संदेश असतो. विहिरीमध्ये उमळ येऊन झऱयाचा आवाज येऊ लागतो. समुद्राची गाज ऐकूनही आता जोरात पाऊस येईल असे म्हणणारी अनेक मंडळी आहेत. पावसाळय़ाच्या आधी काही दिवस समुद्राच्या पाण्याचा रंग लालसर होतो. हासुद्धा निसर्गातील बदल पावसाच्या आगमनाची जाणीव करून देणारा आहे.