वेब न्यूज – मद्यपी वाहनचालकांवर येणार गंडांतर

804

रसायनशास्त्रात नुकताच लागलेला एक नवा शोध, आता मद्यपी वाहनचालकांना शोधून काढण्यासाठी फारच उपयुक्त ठरणार आहे. सध्या पोलीस मद्यपी वाहनचालकांची तपासणी करण्यासाठी त्यांच्या श्वासाचे विश्लेषण ‘ब्रेथ एनालायझर’द्वारे करतात. हे ब्रेथ एनालायझर श्वासाची तपासणी करून तुमच्या रक्तात मद्याचा किती अंश आहे ते सांगते. मात्र आता हे काम श्वासाच्या ऐवजी तुमचा घाम करू लागणार आहे!

अल्बनी येथील युनिव्हर्सिटीत कार्य करणारे रसायन शास्त्रज्ञ जान हॅलेमेक आणि त्यांचे विद्यार्थी यांनी हा अनोखा शोध लावण्यात यश मिळवले आहे. त्यामुळे आता लवकरच ‘ब्रेथ एनालायझर’ची जागा ‘स्वेट एनालायझर’ने घेतली तर आश्चर्य करण्याची आवश्यकता नाही. आपल्या घामाच्या ग्रंथी या रक्ताभिसरण प्रक्रियेच्या अत्यंत जवळ असतात. त्यामुळे जेव्हा तुम्ही एखादी बीअर अथवा इतर कोणत्याही मद्याचे सेवन करता, तेव्हा नसांद्वारे काही इथेनॉल हे रक्तात हस्तांतरित केले जाते. त्यामुळे मद्यपी वाहनचालकाच्या घामाचे विश्लेषण केल्यास, त्याच्या रक्तातील इथेनॉलचे प्रमाण समजणे सहजशक्य आहे. हे नवे तंत्रज्ञान ग्लुकोमीटर किंवा प्रेग्नन्सी टेस्टसारखे काम करणारे आहे. यासाठी शास्त्रज्ञांच्या चमूने त्यांच्या प्रयोगशाळेत एक टेस्ट स्ट्रिप बनवण्यातदेखील यश मिळवले आहे, जी या रक्ताची चाचणी करण्यासाठी बनवण्यात आली आहे. जेव्हा ही पट्टी संशयित वाहनचालकाच्या त्वचेवर ठेवलेली जाते, तेव्हा जर रक्तात इथेनॉल हजर असेल, अर्थात वाहनचालकाने मद्यपान केलेले असेल, तर घामातील इथेनॉल 60 ते 90 सेकंदात त्या पट्टीवरती एक सहजपणे दिसू शकेल असा डाग तयार करते. इथेनॉलचे प्रमाण जेवढे अधिक, डाग तेवढा जास्ती गडद असे हे गणित असणार आहे. श्वासोच्छ्वासाऐवजी आपल्या शरीरातील इथेनॉलची पातळी तपासण्यासाठी घामाच्या पट्टीचा वापर करणे अधिक फायदेशीर ठरणार आहे. कारण ड्रायव्हिंग व्हीलमागील लोक आताच माऊथवॉश खाल्ले असल्याचे निमित्त करू शकतात. शिवाय, मधुमेह असलेल्या लोकांच्या श्वासात एसीटोन म्हणजे आणखी एक प्रकारचे अल्कोहोल असते, त्यामुळे देखील ब्रेथ एनालायझरच्या चाचणीत फरक येऊ शकतो.

आपली प्रतिक्रिया द्या