
>> स्पायडरमॅन
लग्न सोहळा हा जगातल्या कोणत्याही देशात, धर्मात आयुष्यातला एक खास सोहळा असतो. भले परंपरा वेगवेगळ्या असतील, पण त्यातला उत्साह, आनंद ही आयुष्यभरासाठीची एक सुखद आठवण असते. लोकांनादेखील लग्नासारख्या सोहळ्याला उपस्थिती लावायला फार आवडते. लग्नाचे मंगलमय वातावरण, संगीत, लग्न सोहळ्यात साजरे केले जाणारे विविध विधी, आप्तेष्टांच्या गाठीभेटी या सगळ्यांची धमाल अनुभवण्यासाठी लग्न सोहळ्याला हजेरी हवीच, पण अनेकदा हे लग्न सोहळे आपल्या सोयीच्या वेळेला नसतात किंवा तुम्ही नोकरीनिमित्त परिवारापासून शेकडो किलोमीटर लांब असता आणि नात्यातल्या लग्नाला उपस्थित राहू शकत नसता. अशा अनेक निराश लोकांसाठी फेक वेडिंग सेलिब्रेशन अर्थात खोटय़ा लग्न सोहळ्याचा एक अनोखा ट्रेंड देशात सुरू झाला आहे. दिल्ली, पुणे, बंगळुरू अशा महानगरांनंतर आता हा ट्रेंड छोटय़ा शहरांतदेखील धमाल उडवू लागला आहे. लवकरच नोएडामध्ये साजऱया झालेल्या अशा खोट्या लग्न सोहळ्याची पत्रिका सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आलेली आहे. या खोटय़ा लग्न सोहळ्यात सगळे वातावरण खऱया लग्नासारखे असते. सजवलेला मांडव असतो, बँड असतो, पारंपरिक कपडय़ांत तुम्ही हजेरी लावायची असते आणि इथल्या स्वादिष्ट भोजनाचा आनंद घ्यायचा असतो आणि हो, तुम्हाला फोटोशूट करण्याचीदेखील परवानगी असते. फक्त या सोहळ्यात नवरानवरी तेवढे नसतात. नोएडात झालेला हा सोहळा एका मोठय़ा हॉटेलात आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात उपस्थितीसाठी पारंपरिक वेशभूषा आणि तिकीट असणे अनिवार्य होते. पुरुषांसाठी 1500 आणि स्त्रियांसाठी 1000 रुपये तिकिट दर ठेवले होते. विशेष म्हणजे एका मान्यवर वेबसाइटवर या तिकिटांचे आरक्षणदेखील उपलब्ध होते. या भन्नाट ट्रेंडवर लोकांच्या तेवढय़ात भन्नाट प्रतिक्रिया येत आहेत. कोणी एखाद्या गुरुजीला घेऊन आला तर अवघ्या 1500 रुपयांत त्याचे लग्न त्याला इथे करता येईल अशी प्रतिक्रिया अनेक जण देत आहेत, तर लग्न न झालेली जोडपी इथे फोटो काढून लग्न केले म्हणून फसवणार तर नाहीत ना? अशी शंका काही लोक व्यक्त करत आहेत.