बेडकाच्या पेशींपासून “xenobots”

1550

>> स्पायडरमॅन

शास्त्रज्ञांच्या एका चमूला बेडकाच्या जिवंत पेशींच्या मदतीने सजीवांचा एक नवाच वर्ग तयार करण्यात यश मिळाले आहे. अक्षरशः मिलिमीटरच्या आकारात असलेल्या या सजीवांचे नाव सध्या “xenobots” ठेवण्यात आले आहे. ज्याप्रमाणे औषधे शरीरात एखाद्या विशिष्टं ठिकाणी गोळी अथवा इंजेक्शनच्या मदतीने पोचवल्यावर आपल्या लक्षाकडे वाटचाल करतात त्याच प्रकारे हे सजीव आपले लक्ष्य गाठू शकतात. तसेच यांना कुठलीही इजा झाल्यास ते स्वतःच स्वतःला बरेदेखील करतात. या सजीवांना खरेतर ‘जिवंत यंत्र’ म्हणायला हवे असे शास्त्र्ाज्ञांना वाटते. हे पारंपरिक रोबोटस् किंवा इतर सजीवांसारखे जीव नाहीत. ही एक जगातील सजीवांची नवी प्रजातीच आहे.या सजीवांचे डिझाईन UVM इथे सुपर कॉम्प्युटरवर करण्यात आले आणि त्यानंतर Tufts University मधील जीववैज्ञानिकांनी त्यांचे एकत्रीकरण करून त्यांची रचना केली आणि परीक्षण केले. या नव्या सजीव यंत्रांच्या मदतीने अनेक नवे आश्चर्यकारक प्रयोग करता येणे शक्य आहे असे या चमूतील एक शास्त्र्ाज्ञ मायकल लेविन यांचे मत आहे. सध्याची यंत्रे जी कार्ये करण्यास अकार्यक्षम आहेत किंवा बराच वेळ आणि पैसा खर्च करणारी आहेत अशी अनेक कामे जसे की, दूषित, रेडिओऑक्टिव्ह कचरा शोधणे, महासागराच्या पोटातून मायक्रोप्लॅस्टिक गोळा करणे, शरीराच्या धमन्यांमधून दूषित रक्त शोषणे इ. इ. जगात सध्या अनेक क्षेत्रातील तंत्रज्ञान वा यंत्रे ही स्टील, काँक्रीट किंवा प्लॅस्टिकच्या मदतीने तयार झालेली आहेत. मात्र या तंत्रज्ञानांचे काही तोटेदेखील आहेत जसे की निसर्ग आणि मानवी आरोग्याची हानी, महासागरात गोळा होत असलेला प्लॅस्टिकचा बेसुमार कचरा, सिंथेटिक आणि काही इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंपासून होणारे विषारी प्रदूषण. मात्र ही नवी सजीव यंत्रे मात्र कुठल्याही प्रकारचे हानी अथवा प्रदूषण न करता कार्यरत राहू शकतात. याचे आयुष्य अवघे सात दिवस असले तरी एकदा आपली कामगिरी पूर्ण पाडली की हे मृत होतात आणि या मृत पावलेल्या पेशी निसर्गाला किंवा मानवी आरोग्याला बिलकूल नुकसानदायक नसतात हा त्यांचा खरा फायदा आहे.

आपली प्रतिक्रिया द्या