
शेतात गांजाची झाडे लावणाऱया शेतकऱयाला अटक करण्यात आली असून, चार लाखांची गांजाची 60 झाडे हस्तगत करण्यात आली आहेत. हनुमंत धर्मा शिंदे (रा. अनगर, ता. मोहोळ) असे अटक केलेल्या शेतकऱयाचे नाव आहे.
मोहोळ पोलिसांचे तपास पथक अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी गस्त घालत असताना अनगर शिवरातील एका शेतकऱयाने गांजाची लागवड केली असून, या गांजाची तो विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांच्या पथकाला समजली होती. त्यानुसार पोलिसांनी अनगर येथील रेल्वे रुळालगत असणाऱया हनुमंत शिंदे यांच्या शेतात छापा टाकला. त्यावेळी या ठिकाणी गांजाची 60 झाडे मिळाली. पोलिसांनी याबाबत चौकशी केली असता, शिंदे याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पोलीस पथकाने त्याला ताब्यात घेतले असून, गांजाची झाडे जप्त केली आहेत. या गांजाची किंमत तीन ते चार लाखांपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे.
मोहोळ तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे, सहायक फौजदार कदम, युसूफ शेख, कॉन्स्टेबल गणेश दळवी, पांडुरंग जगताप, मंगेश बोधले यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.



























































