Balochistan : पाकिस्तानचा तुकडा पडला, बलुचिस्तान आता स्वतंत्र देश; बलुच नेत्याने केली मोठी घोषणा

बलुचिस्तानने पाकिस्तानपासून स्वतःला वेगळं करत स्वतःला स्वतंत्र देश म्हणून घोषित केलं आहे. राज्यात अनेक दशकांपासून सुरू असलेल्या हिंसाचार आणि मानवी हक्कांचे उल्लंघन यावरून बलुच नेते मीर यार बलोच यांनी बुधवारी पाकिस्तानपासून स्वातंत्र्याची घोषणा केली. ते म्हणाले की, बलुचिस्तान पाकिस्तान नाही. त्यांनी हिंदुस्थान आणि जागतिक समुदायाकडून स्वातंत्र्यासाठी पाठिंबा मागितला आहे.

मीर यार बलोच यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची घोषणा केली आणि लिहिले की, “आम्ही आमचे स्वातंत्र्य मिळवले आहे. पाकिस्तानची दहशतवादी व्यवस्था आता कोसळणार आहे. हिंदुस्थानी सरकारने बलुचिस्तानला दिल्लीत अधिकृत कार्यालय आणि दूतावास उघडण्याची परवानगी द्यावी.” ते म्हणाले की, बलुच स्वातंत्र्यसैनिकांनी डेरा बुगतीच्या गॅस क्षेत्रांवर हल्ला केला आहे, जे पाकिस्तानच्या प्रमुख गॅस पुरवठ्याचे केंद्र आहे.

मीर यार बलोच यांनी संयुक्त राष्ट्रांकडेही आवाहन केलं आहे की, संयुक्त राष्ट्रांनी ताबडतोब बलुचिस्तानात शांतता दल पाठवावे आणि आपल्या जमीन, समुद्र आणि हवाई क्षेत्रातून पाकिस्तानी सैन्य हटवावे. त्यांनी मागणी केली की, पाकिस्तानी सैन्याची सर्व मालमत्ता बलुचिस्तानला सोपवावी आणि सर्व गैर-बलूच सैनिक, आयएसआय आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तात्काळ हा प्रदेश सोडावा. ते म्हणाले आहेत की, लवकरच एक अंतरिम बलोच सरकार स्थापन केली जाईल. ज्यामध्ये महिलांनाही प्रतिनिधित्व मिळेल.