पश्चिम बंगालमध्ये भाजपला गळती, तिसरा आमदार तृणमूलच्या गळाला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपाचे 77 आमदार जिंकून आले होते. मात्र निवडणुकीनंतर काही महिन्यांतच भाजपला गळती लागली आहे. भाजपाचे बागदाचे आमदार विश्वजीत दास यांनी आज सेनेटर हॉटेलमध्ये आयोजित एका कार्यक्रमात तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. भाजपला सोडचिठ्ठी देऊन तृणमूलमध्ये प्रवेश करणारे ते तिसरे आमदार आहेत.

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसची सत्ता पुन्हा आल्यानंतर भाजपाला एकापाठोपाठ एक आमदार सोडचिठ्ठी देताना दिसत आहेत. सोमवारी विष्णुपूरचे भाजप आमदार तन्मय दास यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर बागदाचे आमदार विश्वजीत दास यांनी तृणमूलमध्ये प्रवेश केला आहे. मुकुल रॉय यांनी निवडणुकीनंतर घरवापसी केली होती. विश्वजीत दास हे मुकुल रॉय यांचे समर्थक मानले जातात.

विधानसभेतील भाजपच्या संख्याबळात घट

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपाचे 77 आमदार जिंकून आले होते. निवडणुकीनंतर खासदार निशिथ प्रमाणिक आणि जगन्नाथ सरकार यांनी राजीनामा दिला होता. कारण खासदारपदी राहण्याचे आदेश केंद्रीय नेतृत्वाने दिले होते. त्यामुळे ही संख्या 75वर पोहोचली होती. त्यानंतर मुकुल रॉय, तन्मय दास, विश्वजीत दास यांनी भाजपामधून तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने भाजपच्या विधानसभेतील संख्याबळात घट होऊन ती 72 झाली आहे.