पश्चिम बंगाल – बॉम्ब बनवताना झालेल्या स्फोटात भाजप कार्यकर्त्याचा मृत्यू, 5 गंभीर

प्रातिनिधिक फोटो

पश्चिम बंगालच्या (West bengal) दक्षिण 24 परगना जिल्ह्यात बॉम्ब स्फोटामध्ये भाजप कार्यकर्त्याचा मृत्यू झाला असून 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. क्रूड बॉम्ब बनवताना हा स्फोट झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ‘आज तक‘ने याबाबत वृत्त दिले आहे.

दक्षिण 24 परगना जिल्ह्यातील गोसाबा येथे शुक्रवारी रात्री कथितरित्या क्रूड बॉम्ब बनवण्यात येत असताना अचानक स्फोट झाला. या स्फोटामध्ये एकाचा मृत्यू झाला, तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, बॉम्बस्फोटात मृत्यू झालेला व्यक्ती भाजपचा कार्यकर्ता असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, जखमी व्यक्तींनी आम्ही भाजपचे कार्यकर्ते असून जेवण करत असताना अचानक आमच्यावर क्रूड बॉम्बने हल्ला झाल्याचे म्हटले आहे. मात्र पोलिसांनी हे लोक कथितरित्या क्रूड बॉम्ब तयार करत होते आणि याच दरम्यान झालेल्या स्फोटात जखमी झाल्याचा दावा केला आहे.

पोलीस अलर्ट मोडमध्ये

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचा शंखनाद झाला आहे. आठ टप्प्यात निवडणूक होणार असून 27 मार्चला पहिला टप्प्यातील मतदान होणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यासाठी 1 एप्रिलला मतदान होईल. गोसाबा विधानसभा मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यात मतदान होणार असून तत्पूर्वी येथे स्फोट झाल्याने पोलीस अलर्ट मोडमध्ये आहेत. या प्रकरणी पोलीस कसून तपास करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या