डॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य, ममता बॅनर्जींचे डॉक्टरांना काम सुरू करण्याचे आवाहन

सामना ऑनलाईन । कोलकाता

पश्चिम बंगालमध्ये डॉक्टरांना झालेल्या मारहाणीनंतर संपावर गेलेल्या डॉक्टरांना कामावर रुजू होण्याचे आवाहन मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केले आहे. “पश्चिम बंगालमध्ये एस्मा कायदा लागू करण्याची माझी इच्छा नाही. आम्ही कनिष्ट डॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत, त्यामुळे त्यांनी काम सुरू करावे” असे आवाहन ममता बॅनर्जी यांनी केले आहे.

पश्चिम बंगालमध्ये 10 जून रोजी एनआरएस रुग्णालयात डॉक्टरांना झालेल्या मारहाणीनंतर डॉक्टरांनी संपाचे हत्यार उपसले आहे. डॉक्टरांच्या संपाचा राज्यातील रुग्णसेवेवर मोठा परिणाम होत असल्याने अखेर ममता दीदींनी नमते घेत डॉक्टरांच्या मागण्या मान्य करत त्यांना कामावर रुजू होण्याचे आवाहन केले आहे. “मी सर्व डॉक्टरांना काम सुरू करण्याचे आवाहन करते. हजारो रुग्ण उपचारांच्या प्रतीक्षेत आहेत, राज्यातील आरोग्य सेवा लवकरात लवकर पूर्ववत करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. 10 जूनची घटना दुर्दैवी होती” असेही ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. दरम्यान, ममता बॅनर्जी यांनी शनिवारी बोलावलेल्या बैठकीला आंदोलक डॉक्टरांनी उपस्थित राहणे टाळले आहे. राज्यात दहशतीचे वातावरण असून, भीतीपोटी आणि सुरक्षेच्या कारणास्तव आमचा एकही प्रतिनिधी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासोबतच्या बैठकीला उपस्थित नसल्याचे आंदोलक डॉक्टरांनी जाहीर केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या