
केंद्रशासित प्रदेश पुद्दुचेरीसह आसाम, केरळ, तामीळनाडू, पश्चिम बंगाल या चार राज्यांत मंगळवारी विधानसभा निवडणुकांसाठी 65 ते 82 टक्क्यांच्या आसपास मतदान झाले. कोरोनाचे वाढते टेन्शन तसेच कडाक्याच्या उन्हाची पर्वा न करता मतदारांनी बूथबाहेर रांगा लावल्या होत्या. सायंकाळी 7 वाजेपर्यंत आसाममध्ये 82.29, केरळात 70.04, पुद्दुचेरीत 78.13, तामीळनाडूत 65.11 आणि पश्चिम बंगालमध्ये 77.68 टक्के मतदान झाले.
एकूण 475 जागांसाठी 5857 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. बंगाल आणि आसाममध्ये तिसऱया टप्प्यात मतदान झाले, तर तामीळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरीत मतदानाचा पहिला टप्पा पार पडला. आसाममध्ये शेवटच्या टप्प्यात 12 जिह्यांतील 40 जागांवर मतदान झाले. केंद्रांवर मतदारांच्या मोठय़ा रांगा लागल्या होत्या. केरळातही कडाक्याच्या उन्हात महिला, वृद्ध मंडळी मतदानासाठी उत्स्फूर्तपणे घराबाहेर पडली होती. तामीळनाडू आणि पुद्दुचेरीत अनुक्रमे 234 आणि 30 जागांसाठी शांततेत मतदान झाले.
बंगालमध्ये तृणमूलच्या उमेदवारावर हल्ला
पश्चिम बंगालमध्ये काही ठिकाणी हाणामारीच्या घटना घडल्या. या घटनांबाबत सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि भाजपने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले आहेत. महलापारा येथे तृणमूल काँग्रेसच्या उमेदवार सुजाता मंडल यांच्यावर हल्ला झाला. तसेच आमरबागमध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते समोरासमोर भिडले. मतदान शांततेत सुरू असताना भाजप कार्यकर्त्यांनी वातावरण बिघडवले, असा आरोप तृणमूल काँग्रेसने केला आहे.





























































