पश्चिम रेल्वेचे मोटरमन आंदोलनाच्या पवित्र्यात, कमी मनुष्यबळामुळे रजा मिळेनात; रेल्वे प्रशासनाकडून विविध मागण्यांकडे दुर्लक्ष

पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल ट्रेनचे सारथ्य सांभाळणाया मोटरमनच्या विविध मागण्या पूर्ण करण्यात रेल्वे प्रशासन चालढकल करीत आहे. कमी मनुष्यबळामुळे एक-दोन दिवसही रजा मिळेनाशी झाली आहे. उलट डबल डय़ुटीचा ताण पडत असल्याने मोटरमनमध्ये प्रशासनाविरुद्ध असंतोष वाढत चालला आहे. रेल्वे प्रशासनाच्या जुलमी कारभाराविरोधात मोटरमन आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहेत.

उपनगरी रेल्वेमार्गावरील मोटरमनना एकही साप्ताहिक सुट्टी नसते. केवळ आजारपणाच्या काळात तसेच कौटुंबिक कार्यक्रमावेळी रजा मिळवण्याचा हक्क आहे. या हक्काच्या तुटपुंज्या रजांवरही सध्या गंडांतर आले आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर लोकल फेऱयांच्या तुलनेत मोटरमन-गार्डची संख्या कमी आहे. त्यात दर काही महिन्यांनी अनेक मोटरमन सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे मोटरमनच्या संख्येत सातत्याने घट सुरू आहे. असे असताना नवीन मोटरमनची पुरेशा प्रमाणात भरती केली जात नसल्याने सध्या कार्यरत असलेल्या मोटरमनवर कामाचा ताण वाढला आहे. काwटुंबिक कार्यक्रमावेळीही रजा मिळेनाशी झाली आहे. एक-दोन दिवसांच्या रजेसाठी मुंबई सेंट्रल येथील डीआरएम कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहेत.