
सामना ऑनलाईन, मुंबई
होळी आणि भांग हे उत्तर हिंदुस्थानातून रूढ झालेलं समीकरण हळूहळू देशाच्या विविध भागामध्ये पसरलं. काहीजण भांग थंडाईमध्ये मिसळून पितात तर काहीजण ती बारीक वाटून खातात. भांगेचं सेवन करणारी व्यक्ती अचानक आनंदीत व्हायला लागते. भांगेमुळे डोपामीन हार्मोनचा शरीरातील स्तर वाढल्याने भांगेचं सेवन करणाऱ्या व्यक्तीला आपण आनंदी असल्याचं जाणवायला लागतं. डोपामीन हार्मोन याला हॅपी हार्मोनदेखील म्हणतात, आपली मनस्थिती नियंत्रित करण्याचं काम हे हार्मोन करतात.
भांगेला पाश्चिमात्य देशात कॅनाबी,मारीजुआना,वीड अशी वेगवेगळी नावे आहेत. भांगेत असलेल्या टीएचसीमुळे माणसाचे हॅपी हार्मोन उद्यपीत होत असतात. भांग पिणाऱ्याला मस्त वाटायला लागतं आणि हे मस्त वाटण्याची भावना त्याला भांगेच्या व्यसनाकडे ओढत जाते. भांग चिलीमद्वारे किंवा सिगारेटद्वारे ओढल्यास माणासावर त्याचा परिणाम लवकर होतो, कारण आपली फुफ्फुसं हा धूर शोषतात आणि मेंदूला त्याची ताबडतोब वर्दी मिळते. भांग खाल्ली किंवा प्यायल्यास त्याचा परिणाम होण्यास किमान अर्धातास लागतो. भांगेमुळे काही काळासाठी मेंदू गरजेपेक्षा जास्त सक्रीय होतो यामुळे आजूबाजूला काय चाललंय हे कळेनासं व्हायला लागतं. यालाच भांग चढली असंही म्हणू शकतो. भांगेचं भरपूर सेवन केल्यास आणि ते सातत्याने केल्यास मेंदूवर त्याचा विपरीत परिणाम होण्याची दाट शक्यता असते.
तरुण वयात म्हणजे कॉलेजपासून भांगेची सवय लागली तर त्याचा परिणाम अधिक गंभीर आणि अधिक वाईट होतो. भांगेमुळे मिळणारा आनंद पुन्हा पुन्हा मिळवण्यासाठी तरूण व्यसनाधीन होतो, आनंदप्राप्तीसाठी तो सगळी नाती, अभ्यास, मित्र सोडून देतो. यशस्वी होण्याच्या आनंदापेक्षा भांगेचा आनंद त्या तरुणाला जास्त प्रिय वाटायला लागतो जे त्याच्यासाठी धोकादायक ठरतं.
भांगेचं प्रमाणापेक्षा जास्त सेवन केल्यास माणूस भ्रमिष्ट होतो, वाट्टेल ते बोलायला लागतो, त्याला चित्रविचित्र भास व्हायला लागतात. हृदयविकाराची शक्यता अधिक वाढते आणि रक्तदाबाचा त्रासही होण्याची शक्यता अधिक असते. जगातील 2.5 टक्के जनता म्हणजे जवळपास 14.7 कोटी लोकं भांगेचं सेवन करतात. स्वस्त आणि अधिक नशा देणारी असल्यामुळे भांग नशेखोरांमध्ये प्रसिद्ध आहे.
भांगेचं व्यसन लागणं वाईट आहे, मात्र भांगेचे औषधी गुणदेखील आहेत. बीबीसी हिंदीने याबाबतचे वृत्त देताना म्हटले आहे की भांगेमुळे स्मरणशक्ती वाढते, आणि गोष्टींचे अध्ययन करण्याची क्षमतादेखील वाढते. एकाग्रतेची कमतरता असलेल्या व्यक्तींवर उपचार करण्यासाठी भांगेचा वापर केला जातो. डॉक्टर अशा रुग्णांना नियंत्रित मात्रेमध्ये भांगेच्या सेवनाची परवानगी देऊ शकतात. सतत लघवीला ज्यांना होते, त्यांनाही भांग सेवनाचा सल्ला डॉक्टर देऊ शकतात. कानदुखीवर भांगेच्या पानांचा रस हा गुणकारी ठरतो. कानात हा रश घातल्यानंतर कानदुखी थांबते. खोकल्यावरही भांग प्रभावशाली ठरू शकते.
भांग आणि गांजा एकच आहे ?
लोकांना भांग आणि गांजा एकच आहे असं वाटतं, मात्र हे चुकीचं आहे. एकाच प्रकारच्या झाडापासून तयारी होणारी ही दोन वेगवेगळी उत्पादने आहेत. झाडाच्या नर जातीला भांग आणि मादी जातीला गांजा म्हटलं जातं. गांजा भांगेपेक्षा अधिक कडक असतो. गांजा हा झाडाची पानं, फुलं आणि मुळं सुकवून तयार केला जातो. भांग ही झाडाची पानी बारीक करून तयार केली जाते. हिंदुस्थानात गांजावर बंदी आहे मात्र भांगेचं सेवन सर्रास केलं जातं.































































