सावधान… गुगलवर दिसतायत तुमचे फोटो, फोन नंबर! व्हॉटस्ऍपच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

व्हॉट्सअॅपच्या प्रायव्हसी पॉलिसीवरून गदारोळ सुरू असतानाच या अॅपच्या सुरक्षिततेवरही आता प्रश्नचिन्ह उपस्थितझाले आहे. व्हॉट्सअॅप ग्रुपच्या इन्वाईट लिंक आणि प्रोफाईल गुगल सर्चवर दिसत असल्याचा दावा इंटरनेट सिक्युरिटीरिसर्चर राजशेखर राजाहरिया यांनी केला आहे. या लिंकवर क्लिक करून कूणीही प्रोफाईल फोटो, फोन नंबर या सारखी महत्त्वाची माहिती मिळवू शकतो. इतकचं  कायतर  अनोळखी  व्यक्तीही व्हॉट्सअॅपचे  प्रायव्हेट ग्रुप शोधून  तो ग्रुप  जॉईन करू शकतात, असा दावा देखील  त्यांनी  केला  आहे.  त्यामुळे  आपल्या  प्रोफाईल्सच्या  सुरक्षिततेबाबत युजर्समध्ये चिंतेचे वातावरण आहे.

राजशेखर यांनी गुगलवर सर्च केलेले काही स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. त्यात chat.whatsapp.com हे सर्च केल्यानंतर गुगलवर व्हॉट्सअॅपच्या अनेक लिंक पाहायला मिळत आहेत. गॅजेट 360 च्या माहितीनुसार, यात मराठी, बंगाली यासारख्या युजर्ससाठी ग्रुप्स बनवण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या ग्रुपमध्ये अनोळखी युजर्स देखील सहभागीहोऊ शकतात. गुगलवर अशाप्रकारच्या लिंक्स, प्रोफाईल्स दिसण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी 2019 मध्येदेखील अशाप्रकारची त्रुटी समोर आली होती. त्यावेळी ही त्रूटी दूर झाली होती.

…म्हणून सिग्नलची क्रेझ वाढली!

व्हॉट्सअॅपच्या प्रायव्हसी पॉलिसीमुळे हिंदुस्थानसह जगभरातील युजर्स नाराज असून त्यांची पसंती सिग्नल या अॅपला मिळतेय. हे अॅप लोकप्रिय होण्यामागे अनेक कारणे आहेत. टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांच्या आवाहनानंतर या अॅपच्या डाऊनलोडिंगमध्ये वाढ झाली आहे. या अॅपची खासियत म्हणजे युजरकडून डेटा मागितला जात नाही किंवा स्टोअर देखील केला जात नाही. सिग्नलवर फक्त तुमचा मोबाईल नंबर स्टोअर केला जातो. जूने मॅसेज आपोआप गायब करण्याचे आणि  फोटो  एडिटिंगचे  फिचर  यात  आहे.  तसेच  ’डेटा  लिंक्ड  टु  यू’  हे  फिचर  सुरू  केल्यावर कुणी चॅटचा स्क्रिनशॉट देखील घेऊ शकत नाही.