
अमित घोडेकर,[email protected]
कधीकाळी याहूची एक पंच लाइन होती ती म्हणजे ‘व्हेयर द वर्ल्ड चेक्स इन डेली’ अर्थात जगातले इंटरनेट वापरणारे जवळपास सगळेच दिवसातून कधीतरी एकदा याहूमध्ये लॉगीन करतातच. ते दिवस होते नव्वदीचे आणि याहू आपल्या ऐन तारुण्यात होता १९९० ते २०१० या वर्षात इंटरनेटच्या मायाजालात याहूने नुसता धुमाकूळ घातला होता त्याकाळी इंटरनेट म्हणजे याहू आणि याहू म्हणजे इंटरनेट. इंटरनेट वापरायची पहिली पायरी म्हणजे तुम्हाला याहू वापरता यायला पाहिजे एकदा का तुम्ही याहू वापरू लागला की तुम्हाला इंटरनेट वापरता आलं असं समजा. कॉलेजमधले किंवा नुकतेच इंटरनेट वापरणारे तरुण-तरुणी तर याहूचे सगळ्यात मोठे वापरकर्ते. जेव्हा फोन किंवा मोबाईलचे बिल भरमसाट येत असे त्याकाळी याहू मेसेंजर म्हणजे समस्त तरुण मंडळींचा तासान्तास बसण्याचा अड्डाच. जगातले कोटय़वधी लोक दिवसातले अनेक तास याहू मेसेंजरवर चॅट अर्थात एकमेकांशी गप्पा मारत बसत. जगाला याहूने काय दिले असेल तर मेसेंजर पण आता हेच याहूचे जगप्रसिद्ध मेसेंजर आता बंद होत आहे.
असं म्हणतात कालाय तस्मे नमः, म्हणजेच काळाचा महिमा अगाध आहे कुठलीच गोष्ठ काळासमोर टिकत नाही वैगरे वगैरे. गेल्या वर्षी याहू या जगातील सगळ्यात मोठय़ा ईमेल आणि मेसेंजर कंपनीला वेरिझोनने विकत घेतले खरंतर याहूचा नफा एवढा कमी झाला होता की याहूला दुसऱया कुठल्यातरी मोठय़ा कंपनीपुढे हात पसरण्याशिवाय पर्यायच राहिला नव्हता मग कसाबसा वेरिझोनने याहूला विकत घेतले तिथेच याहूची घसरण सुरू झाली होती. याहूच्या बाबतीत असे का घडले असेल तर याचे कारण म्हणजे याहूने सोडलेल्या अनेक चांगल्या संधी. असं म्हणतात की चांगली संधी सोडायची नसते, पण त्या याहूने सोडून दिल्या आणि होत्याचे नव्हते करून घेतले.
१९९८ साली गुगलने याहूसमोर आपली पेज रॅक नावाची सेवा विकत घेण्याची विनंती केली होती त्याकाळी ल्यारी पेज आणि त्याचा गुगलचा सहकारी सरजी ब्रिन दोघेही शिकत होते आणि दोघांनाही शिकण्यासाठी जास्त वेळ हवा होता. त्यामुळे त्यांना गुगलवर जास्त लक्ष केंद्रित करता येत नव्हते मग गुगलची एक सेवा जेवढी तयार होती ती विकण्याचे त्यांनी ठरवले आणि सगळ्यात पहिले याहूला ते विकत घेण्यासाठी सांगितले तेदेखील अतिशय कमी किमतीत, पण त्याकाळी इंटरनेटवरच्या सगळ्यात मोठय़ा याहूने गुगलकडे साफ दुर्लक्ष केले.
आज गुगल ५०० बिलियन एवढी मोठी कंपनी आहे तर याहू फक्त ५ बिलियन. याहूची सगळ्यात मोठी घोडचूक म्हणजे फेसबुक विकत न घेण्याची गुगलप्रमाणेच फेसबुकदेखील याहूकडे विकत देण्यासाठी आली होती, पण याहूने तेदेखील धुडकावून लावली. एकीकडे याहू गुगल आणि फेसबुकसारख्या नवख्या कंपन्या ज्या स्वस्तात विकत मिळत होत्या ते घेत नव्हते आणि दुसरीकडे याहू अनेक मोठय़ा कंपन्या विकत घेत होते ज्या चालत नव्हत्या. असंच काहीसं २००८ मध्ये झालं जेव्हा मायक्रोसॉफ्टने याहू विकत घेण्यासाठी तब्बल ४४ बिलियन डॉलर मोजायची तयारी दाखवली होती, पण याहूने ही किंमत धुडकावून लावली अखेर २०१६ मध्ये याहूला स्वताला वेरिझोनला अवघ्या ४ बिलियन डॉलरमध्ये विकावे लागले. याहूच्या अपयशाशी अशी डझनभर कारणे आहेत. नोकिया आणि ब्लॅकबेरीची झालेली वाताहत दिसूनदेखील याहूने आपले जगप्रसिद्ध याहू मेसेंजर वाचवण्यासाठी कोणतेच प्रयत्न केले नाहीत, कारण त्यांना नेहमी असे वाटले की, आपले मेसेंजर हे सर्वश्रेष्ठ आहे. हा फाजील आत्मविश्वास हेच याहूच्या शेवटाचे सगळ्यात मोठं कारण आहे. याहूचं मेसेंजर काही काळ दुसऱया नावाने चालू राहणार आहे, पण सध्याची स्थिती बघता याहूचा शेवट जवळ आला आहे.






















































